गत २०१७ या वर्षातील शेवटच्या तिमाहीच्या (ऑक्टोबर ते डिसेंबर) कालखंडात भारतीय बाजारपेठेत विकल्या गेलेल्या स्मार्टफोनच्या आकडेवारीवरून काऊंटरपॉइंट आणि कॅनालीज या दोन रिसर्च करणार्या संस्थांनी आपला अहवाल सादर केला आहे. यानुसार संबंधीत ३ महिन्यांच्या कालखंडात शिओमीने सॅमसंगला पहिल्या क्रमांकावरून खेचून स्वत: अव्वल स्थान प्राप्त केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून सॅमसंग कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर विराजमान होती. ही बाब लक्षात घेता फक्त तीन वर्षे आधी भारतात आलेल्या शिओमीने किती जबरदस्त वेगाने मुसंडी मारली याची आपल्याला प्रचिती येत आहे. या अहवालांचा विचार केला असता या कालखंडात शिओमीने ८२ लाख तर सॅमसंगने ७३ लाख हँडसेट विकले आहेत. अर्थात भारतीय बाजारपेठेत शिओमी पहिल्या क्रमांकावर पोहचली असून सॅमसंग या तिमाहीत दुसर्या क्रमांकावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. यानंतर लेनोव्हो, ओप्पो आणि विवो या चीनी कंपन्यांचा क्रमांक आहे. मात्र २०१७च्या पहिल्या सहामाहीत सॅमसंग कंपनीने जोरदार कामगिरी केल्यामुळे वर्षभरातील आकडेवारीचा विचार केला असता सॅमसंग अग्रस्थानी आहे. तथापि, शेवटच्या तिमाहीत शाओमीने जोरदार आगेकुच केली असून हा ट्रेंड २०१८च्या पहिल्या तिमाहीतही कायम राहण्याची शक्यता आहे.
शिओमी कंपनीने अत्यंत किफायतशीर दरात उच्च दर्जाचे फिचर्स असणार्या स्मार्टफोनच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. अलीकडचा विचार केला असता शिओमीचे रेडमी नोट ४ आणि रेडमी ५ए या दोन मॉडेल्सला अतिशय उत्तम यश लाभले आहे. आजही हे मॉडेल्स मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. तर दुसरीकडे सॅमसंग ही कंपनी जगात पहिल्या क्रमांकावर असली तरी आता शिओमीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. लवकरच सॅमसंगचा गॅलेक्सी एस९ आणि एस९ प्लस हे फ्लॅगशीप स्मार्टफोन्स लाँच होणार आहे. याला उत्तम यश लाभल्यास शिओमीच्या आव्हानाचा प्रतिकार करण्यास सॅमसंग यशस्वी होईल. अन्यथा, कमी मूल्यात उत्तमोत्तम मॉडेल्सच्या फॉर्म्युल्यावर शिओमीची घोडदौड सुरूच राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.