Xiaomi ने 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी सादर केली आहे आणि दावा केला आहे कि, ही टेक्नॉलॉजी 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी फक्त ८ मिनिटांत चार्ज करू शकते. त्याचबरोबर, कंपनीने 120W वायरलेस टेक्नॉलॉजी देखील जगासमोर ठेवली आहे, जी तेवढीच क्षमता असलेली बॅटरी फक्त १५ मिनिटांत चार्ज करू शकते. विशेष म्हणजे गेल्यावर्षी कंपनीने आपल्या Mi 10 अल्ट्रा या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग आणि 80W चार्जिंग सपोर्ट दिला होता. आता कंपनीने 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी आणली आहे. यामुळे शाओमी जगातील पहिली 200W फास्ट चार्जिंग देणारी स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. (Xiaomi demos 200W charger, charges custom Mi 11 Pro in just 8 minutes)
या चायनीज (चिनी) कंपनीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 200W HyperCharge फास्ट चार्जिंग आणि 120W वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा केली. शाओमीने या टेक्नॉलॉजीचे प्रात्यक्षिक दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात किती वेगाने 4,000mAh ची बॅटरी या वायर्ड टेक्नॉलॉजीद्वारे चार्ज केली जाते हे दाखविले आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, फक्त ४४ सेकंदात हा फोन १० टक्के चार्ज होतो आणि फोन फुल चार्ज करण्यासाठी आठ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
इतर स्मार्टफोन कंपन्यांकडे पण फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. Oppo कडे सध्या 125W फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजी आहे जी फक्त २० मिनिटांत 4,000mAh ची बॅटरी चार्ज करू शकते. तर Realmeच्या 125W अल्ट्रा डार्ट टेक्नॉलॉजीचा वेग पण तेवढाच आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, शाओमीने 120W वायरलेस टेक्नॉलॉजी पण सादर केली आहे. या दोन्हींचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी कंपनीने कस्टम बिल्ट Mi 11 Pro चा वापर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, Mi 11 Pro ज्यात एक 4,000mAh ची बॅटरी आहे, फक्त एका मिनिटात १० टक्के चार्ज झाला. तर ५० टक्के चार्ज होण्यासाठी ७ मिनिटे आणि फुल चार्जसाठी १५ मिनिटांचा वेळ लागला.
शाओमीने जरी ही टेक्नॉलॉजी जगासमोर ठेवली असली तरी या टेक्नॉलॉजीसह स्मार्टफोन बाजारात कधी उपलब्ध होतील याची माहिती दिलेली नाही. ही टेक्नॉलॉजी लवकरच फ्लॅगशिप फोन्समध्ये दिसू शकते, अशी चर्चा आहे.