चीनची स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने भारतात कमी कालावधीत पाय पसरले आहेत. आता ही कंपनी मोबाईलसह अन्य उत्पादनांच्या क्षेत्रात उतरली आहे. इलेक्ट्रीक स्कूटरही या कंपनीने लाँच केली आहे. आता तर शाओमीने LED स्मार्ट बल्ब बाजारात आणला आहे. महत्वाचे म्हणजे हा बल्ब सलग 11 वर्षे खराबच होऊ शकणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.
शाओमीने नुकताच Redmi Y3 आणि Redmi 7 हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. याबरोबरच हा एलईडी बल्बही लाँच केला आहे. हा बल्ब एमआय स्टोअरवर 26 एप्रिलपासून मिळणार आहे.
Mi LED बल्बमध्ये 16 दशलक्ष रंग असून 11 वर्षांचे आयुष्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या बल्बमध्ये गुगल असिस्टंस आणि अॅमेझॉन अॅलेक्सा इनबिल्ट देण्यात आले आहे. या बल्बला चालू-बंद करण्यासाठी एमआय होम अॅपवरून सोय आहे. तसेच व्हाईस कमांडही देता येते. या बल्बला इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) डिव्हाइस म्हणून लाँच केले गेले आहे. या बल्बची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
या एलईडी बल्बशी कनेक्ट व्हायला कोणत्याही हबची गरज नाही. तुम्ही थेट होल्डरमध्ये फिट करू शकता. तसेच अॅपद्वारे नियंत्रित करू शकता. अॅपद्वारे रंगही बदलता येतो. बल्बचा ब्राईटनेसही नियंत्रित करता येतो.