शाओमी कंपनीने मी नोटबुक प्रो हा लॅपटॉप लाँच केला असून या माध्यमातून अॅपलच्या मॅकबुक प्रो या मॉडेलला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी नोटबुक प्रो लॅपटॉप हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उतारण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याच्या तीन व्हेरियंटमध्ये आठव्या पिढीतील कोअर आय-५ व कोअर आय-७ प्रोसेसर देण्यात आले आहेत. यासोबत एनव्हिडीयाचे जीफोर्स एमएक्स-१५० हे ग्राफीक्स कार्डही असेल. हे मॉडेल आठ जीबी रॅमचे दोन तर १६ जीबी रॅमचे एक अशा एकूण तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये स्टोअरेजसाठी २५६ जीबी ते एक टिबीपर्यंतचे पर्याय असतील. यात १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे.
मी नोटबुक प्रो लॅपटॉप या मॉडेलच्या ट्रॅकपॅडवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. यात थ्री-इन-वन या प्रकारातील कार्ड रीडर असेल. याच्या जोडीला दोन युएसबी टाईप-सी पोर्ट, दोन युएसबी पोर्ट, एक एचडीएमआय पोर्ट देण्यात आलेले आहेत. हा लॅपटॉप ६० वॅट क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असून ही बॅटरी अवघ्या ३५ मिनिटांमध्ये निम्मे चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
मी नोटबुक प्रो लॅपटॉप याचे मूळ मॉडेलचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ९८० डॉलर्स इतके असेल. तर मॅकबुक प्रो या मॉडेलचे विविध व्हेरियंट १९९९ डॉलर्सच्या पुढे मिळतात. याचा विचार करता मॅकबुक प्रो या मॉडेलच्या तोडीस तोड फिचर्स देतांना शाओमी कंपनीने आपल्या मी नोटबुक प्रो या मॉडेलचे मूल्य यापेक्षा तब्बल निम्म्याने कमी ठेवले आहे. यामुळे मॅकबुक प्रो या मॉडेलला तगडे आव्हान देण्याचा शाओमीचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. मी नोटबुक प्रो लॅपटॉप पहिल्यांदा चीनी बाजारपेठेत मिळणार असला तरी येत्या काही दिवसातच हे मॉडेल भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.