शाओमी कंपनीचे रेडमी नोट ४ हे मॉडेल लागोपाठ तिसर्या तिमाहीत सर्वाधीक विकला जाणारा स्मार्टफोन बनला असून ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. शाओमी कंपनीने भारतात १० ते १५ हजार रूपयांच्या दरम्यानच्या मध्यम किंमतपट्टयावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. आणि या पट्टयातील शाओमी रेडमी नोट ४ या मॉडेलला भारत व चीनसह अन्य राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. तथापि, काऊंटरपॉइंट या रिसर्च करणार्या संस्थेच्या ताज्या अहवालातून याची लोकप्रियता अबाधित असल्याचे दिसून आले आहे.
या संस्थेने २०१७च्या तिसर्या तिमाहीतील (जुलै-सप्टेबर) स्मार्टफोन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार शाओमी रेडमी नोट ४ हा स्मार्टफोन लागोपाठ तिसर्या तिमाहीतही देशात सर्वाधीक विकले जाणारे मॉडेल बनले आहे. अर्थात याचमुळे शाओमीच्या विक्रीत तब्बल २९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरीही सॅमसंगने एकंदरीत स्मार्टफोन विक्रीतील आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. या कंपनीचा भारतीय बाजारपेठेतील वाटा (मार्केट शेअर) २२.८ टक्के आहे. तर दुसरीकडे शाओमीनंतर विवो आणि ओप्पो या दोन्ही कंपन्यांनीही चांगली कामगिरी करत विक्रीत चांगली वाढ नोंदवली आहे. महत्वाची बाब म्हणजे फिचरफोनमध्ये मायक्रोमॅक्सने चांगली कामगिरी करत तिसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मायक्रोमॅक्ससह अन्य भारतीय कंपन्यांची अलीकडच्या काळातील खराब कामगिरी पाहता गत तिमाहीत मायक्रोमॅक्स नव्या दमाने बाजारपेठेत उभी राहिल्याचे दिसून येत आहे. आगामी कालखंडात सॅमसंगच्या पहिल्या क्रमांकाला शाओमी तगडे आव्हान देणार असल्याचे या तिमाहीतल्या आकडेवारीतून दिसून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शाओमी रेडमी नोट ४ हा स्मार्टफोन २ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज; ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज या तीन विविध व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. या सर्व व्हेरियंटमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजे फुल एचडी क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो या प्रणालीवर चालणारे असून यात ४१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. यातील कॅमेरे हे १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कसह फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे.