शाओमी कंपनी आता भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत अग्रस्थानी विराजमान झाली आहे. या कंपनीने जाणीवपूर्वक आपल्या उत्पादनांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार स्मार्टफोनसह अन्य अॅसेसरीज आणि उपकरणांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. या अनुषंगाने शाओमी कंपनीने आपल्या रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो या स्मार्टफोनच्या सोबत 'मी एलईडी स्मार्ट टिव्ही ४' या नावाने ५५ इंची डिस्प्ले असणारा स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केला आहे. अन्य उपकरणांप्रमाणे शाओमीने हा स्मार्ट टिव्हीदेखील अत्यंत किफायतशीर दरात म्हणजेच ३९,९९९ रूपयात ग्राहकांना उपलब्ध केला आहे. सध्या बाजारपेठेत ५५ इंची स्मार्ट एलईडी टिव्ही इतक्या कमी मूल्यात उपलब्ध नसल्यामुळे शाओमीने या क्षेत्रात अतिशय आक्रमक पध्दतीने एंट्री केल्याचे मानले जात आहे.
शाओमीच्या या स्मार्ट टिव्हीमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यातील सर्वात लक्ष्यवेधी बाब म्हणजे यामध्ये ४-के क्षमतेचा सॅमसंग कंपनीने तयार केलेला डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर कुणीही१७८ अंशाच्या व्ह्यूइंग अँगलसह २१६० बाय ३८४० पिक्सल्स क्षमतेचे अतिशय सुस्पष्ट आणि एचडीआर म्हणजेच हाय डायनॅमीक रेंज या तंत्रज्ञानाने सज्ज असणारे चित्र पाहू शकतो. यातील दुसरी खास बाब म्हणजे हा स्मार्ट टिव्ही अवघ्या ४.९ मीलीमीटर जाडीचा अर्थात एखाद्या स्मार्टफोनपेक्षाही स्लीम आहे. हा जगातील सर्वात स्लीम स्मार्ट टिव्ही असल्याचा शाओमीचा दावा आहे. याचा डिस्प्ले हा फ्रेमलेस या प्रकारातील असून तो सहजपणे कुठेही ठेवणे वा अटॅच करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात कोर्टेक्सचा क्वॉड-कोअर ए-५३ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एचडीएमआय, युएसबी, इथरनेट आणि एव्ही पोर्ट आदी सुविधा आहेत. हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा असून यावर गुगल प्ले स्टोअरवरील विविध अॅप्स वापरता येतील. यात शाओमीची पॅचवॉल प्रणाली देण्यात आली असून या कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त प्रणालीच्या मदतीने युजरच्या आवड-निवडीशी संबंधीत कंटेंट त्याला सुचविण्यात येते. विशेष म्हणजे यात १५ भारतीय भाषांचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे. खास भारतीय ग्राहकांसाठी शाओमी कंपनीने अमेझॉन प्राईम व्हिडीओसह अन्य ऑन डिमांड व्हिडीओ सेवांसोबत करार केला असून याचाही आनंद ग्राहकाला मिळेल. ध्वनीच्या उत्तम अनुभुतीसाठी यात डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस प्रणालीसह दोन स्पीकर देण्यात आले आहेत. तर हा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही विविध डीटीएच व केबल कंपन्यांच्या सेट टॉप बॉक्सलाही संलग्न करता येतो. ग्राहकांना हे मॉडेल शाओमी कंपनीच्या मी.कॉम आणि फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येईल.