मुंबई - शाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटच्या मूल्यात प्रत्येकी एक हजार रूपये इतकी घट केल्याचे जाहीर केले आहे. शाओमी कंपनीने जुलै महिन्यात शाओमी मी मॅक्स २ हा स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर सप्टेंबर महिन्यात याची ३२ जीबी स्टोअरेजची दुसरी आवृत्ती सादर करण्यात आली होती. सध्या ६४ जीबी स्टोअरेजयुक्त मी मॅक्स २ हा स्मार्टफोन १६,९९९ तर ३२ जीबी स्टोअरेजचे मॉडेल १४,९९९ रूपयात ग्राहकांना मिळत आहे. आता ६४ जीबी व्हेरियंट १५,९९९ तर ३२ जीबी व्हेरियंट १३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. मूल्यातील ही घट कायमसाठीच करण्यात आल्याचे शाओमी कंपनीचे भारतीय विभागाचे प्रमुख मनुकुमार जैन यांनी एका ट्विटद्वारे जाहीर केले आहे.
फिचर्स शाओमी मी मॅक्स २ मध्ये ६.४४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. यात ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर आहे. याची रॅम चार जीबी आणि अंतर्गत स्टोअरेज ६४ असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. यामध्ये क्विकचार्ज ३.० या तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारी तब्बल ५,३०० मिलीअँपिअर क्षमतेची जंबो बॅटरी देण्यात आली आहे.
शाओमी मी मॅक्स २ या मॉडेलमध्ये सोनी आयएमएक्स ३८६ या इमेज प्रोसेसरने युक्त असणारा १२ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येईल. तर यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर आधारित एमआययुआय या प्रणालीवर चालणारा आहे.