Future Smartphone Concept: यंदाचं वर्ष संपण्यासाठी दोन आठवडेच शिल्लक राहिले आहे. २०२२ मध्ये आपण अनेक नव्या तंत्रज्ञानांचा आविष्कार पाहिला. भारतात याच वर्षात 5G सेवा देखील सुरू झाली. तर मोस्ट हाइप्ड फोन म्हणजेच Nothing Phone 1 चीही जोरदार चर्चा झाली. टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात यंदाच्या वर्षात बरंच काही नवनवं पाहायला मिळालं. आता वर्षाचा शेवट होत असताना Neuralink चेही डिटेल्स समोर आले आहेत. जी फ्यूचर टेक्नोलॉजी मानली जाऊ शकते.
आता स्मार्टफोनचं भविष्याबाबतची नवी माहिती समोर आली आहे. भविष्यात स्मार्टफोन नेमके कसे असतील, त्याचा वापर कसा केला जाईल आणि त्यात कोणकोणतं नवं तंत्रज्ञान अनुभवायला मिळेल याची माहिती प्रत्येकाला जाणून घ्यायची आहे. पण भविष्यात स्मार्टफोनचं युगच नष्ट होईल असं म्हटलं जात आहे.
आता दोन दशकांपूर्वी स्मार्टफोनचं प्रस्थ इतकं वाढेल असा कुणीच विचार केला नव्हता. कॉर्डलेस फोनपासून स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आता भविष्यात स्मार्टफोनची गरजच भासणार नाही असं म्हटलं जात आहे. कारण नोकिया कंपनीचे सीईओ पेक्का लँडमार्क यांनी केलेल्या भविष्यवाणीमुळे सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. विशेष म्हणजे लँडमार्क यांच्या विधानाला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही पाठिंबा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स टॅटूज हेच भविष्यातील स्मार्टफोन असतील असं त्यांचं म्हणणं आहे.
स्मार्टफोन संपुष्टात येणार?नोकियाचे सीईओ Pekka Lundmark यांच्या मतानुसार २०३० सालापर्यंत 6G तंत्रज्ञान आलेलं असेल पण त्यावेळी स्मार्टफोन सध्यासारखे कॉमन इंटरफेस नसतील. सध्या स्मार्टफोन एक कॉमन इंटरफेस आहे. पण येत्या काळात याची जागा इतर वस्तू घेईल. उदा. स्मार्टवॉच किंवा स्मार्ट ग्लासमध्येही फोनच्या सर्व सुविधा मिळतील.
"सध्या आपण जे स्मार्टफोन वापरत आहोत ते २०३० सालापर्यंत तसेच नसतील. त्यांचं स्वरुप बदलेलं असेल. ते खूप जास्त वापरलं जाणारं डिव्हाइस राहणार नाही. स्मार्टफोनमधील बरेचसे फिचर्स थेट मानवी शरीरातच उपलब्ध होतील", असं नोकियाचे सीईओ म्हणाले.
मानवी शरीरात लागणार सिमकार्ड अन् चिपसेट?मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचंही असंच काहीसं म्हणणं आहे. येत्या काळात स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटूज घेऊ शकतात. तुम्ही बऱ्याच सिनेमांमध्ये असे डिव्हाइस पाहिले असतील. गेट्स यांच्या मतानुसार डिव्हाइसचा वापर करुन स्मार्टफोन कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात इंटीग्रेट केला जाऊ शकतो. भविष्यात काय होईल हे कुणालाच ठाऊक नाही, पण भविष्याचा रस्ता वर्तमानातील कल्पनेच्याच वळणाने जातो असं म्हणतात. कॉर्डलेस, मोबाइल फोन्स एकेकाळी फक्त कल्पनेचा विषय होता. पण आज स्मार्टफोनचं विकसित रुप आपण पाहिलं आहे.