फोन टॅप होत असल्याचा संशय आहे? अशी मिळणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:09 PM2018-12-08T17:09:14+5:302018-12-08T17:14:17+5:30
फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो.
नवी दिल्ली - स्मार्टफोन प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. कधी कधी फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो. दिल्लीउच्च न्यायालयाने माहिती मिळवणं हा ग्राहकाचा अधिकार असल्याने ट्रायला ग्राहकाने याबाबत माहिती मागितल्यास ती देणं हे बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.
न्यायमूर्ती सुरेश यांनी एका प्रकरणाचा आदेश देताना माहिती अधिकार कायद्यातील एका तरतूदीनुसार कोणतेही जन प्राधिकरण खासगी संस्थेकडून माहिती मागवू शकते आणि ही माहिती देणं त्या खासगी संस्थेला बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. कबीर शंकर बोस नावाच्या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर आदेश देत असताना न्यायमूर्तींनी ही महत्वाची बाब नमूद केली आहे. बोस यांनी व्होडाफोन या कंपनीकडून माहिती मागितली होती, जी देण्यास त्यांनी नकार दिला होता. आपण खासगी संस्था असल्याने ही माहिती देऊ शकत नाही असं व्होडाफोनचं म्हणणं होतं. हे प्रकरण जेव्हा केंद्रीय माहिती आयोगाकडे पोहोचलं तेव्हा त्यांनी ट्रायला व्होडाफोनकडून बोस यांना अपेक्षित असलेली माहिती मिळवून देण्याचे आदेश दिले होते.
बोस यांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांच्याकडे असलेल्या दस्तावेजात उपलब्ध नसून व्होडाफोन कंपनीकडेच माहिती उपलब्ध असल्याचे दावा ट्रायने केला होता. व्होडाफोनने पूर्वीप्रमाणेच आपण खासगी संस्था असल्याचं म्हणत हात वर केले होते. माहिती अधिकार कायद्यात प्राधिकरण खासगी संस्थेकडून माहिती गोळा करून ती माहिती मागणाऱ्या नागरिकाला देण्यासाठीची कोणतीही तरतूद उपलब्ध नसल्याचं असा व्होडाफोनतर्फे त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद सादर केला होता. मात्र न्यायालयाने ट्रायला बोस यांना अपेक्षित माहिती व्होडाफोन कडून घेऊन देण्यात यावी असं सांगितलं आहे.