गुगलच्या (Google) व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने (Youtube) आपल्या ॲड-फ्री सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. यूट्यूबच्या या निर्णयाचा परिणाम इंडिव्हिज्युअल, स्टुडंट आणि फॅमिली प्लॅन्सवर होणार आहे.
काही प्लॅनच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे, परंतु काही प्लॅनच्या किंमती २०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. यूट्यूब प्रीमियम प्लॅनच्या किंमती ५८ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. कंपनीकडे सध्या युजर्ससाठी मासिक, ३ महिने आणि १२ महिन्यांचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आहेत.
नवीन किमतींसह यूट्यूब प्रीमियम प्लॅन्स कंपनीच्या अधिकृत साइटवर लाइव्ह झाले आहेत. इंडिव्हिज्युअल (मासिक) प्लॅनची जुनी किंमत १२९ रुपये आणि नवीन किंमत १४९ रुपये आहे. स्टुडंट (मासिक) प्लॅनची जुनी किंमत ७९ रुपये आहे आणि नवीन किंमत ८९ रुपये आहे, तर फॅमिली (मासिक) प्लॅनची जुनी किंमत १८९ रुपये होती. मात्र, आता युजर्सला या प्लॅनसाठी २९९ रुपये खर्च करावे लागणार आहेत.
इंडिव्हिज्युअल प्रीपेड (मासिक) प्लॅनची जुनी किंमत १३९ रुपये होती, परंतु आता युजर्सला हा प्लॅन १५९ रुपयांना मिळेल, तर ३ महिन्यांच्या प्लॅनसाठी ३९९ रुपयांऐवजी तुम्हाला ४५९ रुपये खर्च करावे लागतील. तसेच, कंपनीचा युजर्ससाठी वार्षिक प्लॅन देखील आहे. इंडिव्हिज्युअल प्रीपेड (वार्षिक) प्लॅनची जुनी किंमत १२९० रुपये होती, मात्र, आता हा प्लॅन २०० रुपयांनी महाग झाला आहे. किंमत वाढल्यानंतर आता या प्लॅनसाठी १४९० रुपये मोजावे लागणार आहेत.
YouTube Premium Benefitsयूट्यूब प्रीमियमसह युजर्सना व्हिडिओ पाहताना ॲड-फ्री स्ट्रीमिंग एक्सपिरियन्स मिळतो. याशिवाय, प्रीमियम युजर्स बॅकग्राउंड व्हिडिओ आणि म्युझिक देखील ऐकू शकतात. दुसरीकडे, ज्यांच्याकडे सब्सक्रिप्शन प्लॅन नाही, त्यांना बॅकग्राउंड म्युझिक ऐकण्याची सुविधा मिळत नाही. एवढेच नाही तर यूट्यूब प्रीमियमसह युजर्सना पिक्चर-इन-पिक्चर मोड आणि एन्हांस्ड हाय डेफिनेशन व्हिडिओ स्ट्रीमिंगची सुविधा मिळते.