गुगल (Google) आपल्या लाखो यूट्यूब (YouTube) युजर्सना नवीन वर्षात मोठा धक्का देणार आहे. जाहिरातींशिवाय यूट्यूबवर व्हिडिओ पाहणे अधिक महाग होणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी जानेवारीपासून यूट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन महाग करणार आहे. कंपनीने अलीकडेच जागतिक स्तरावर यूट्यूबचे सबस्क्रिप्शन प्लॅन वाढवले होते. यूट्यूबची नवीन प्रीमियम सदस्यता योजना १३ जानेवारी २०२५ पासून प्रभावी होईल. त्यामुळे युजर्स १२ जानेवारीपर्यंत जुन्या दराने सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करू शकतात.
The Verge च्या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी १३ जानेवारी २०२५ पासून यूट्यूब प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन महाग होईल. कंपनी पूर्वीपेक्षा १० डॉलर जास्त चार्ज आकारणार आहे. सध्या यूट्यूब प्रिमियमच्या बेसिक प्लॅनसाठी ७२.९९ डॉलर खर्च करावे लागतील. प्लॅन दर सुधारित केल्यानंतर युजर्सना ८२.९९ डॉलर खर्च येईल. अशा प्रकारे युजर्सला यूट्यूब प्रिमियमसाठी १० डॉलर जास्त खर्च करावे लागतील.
सध्या भारतात यूट्यूब प्रिमियमच्या किमतीत कोणतीही वाढ जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच भारतात यूट्यूब प्रिमियम प्लॅन महाग केला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत जेव्हा-जेव्हा यूट्यूब प्रिमियम प्लॅनचे दर वाढवले गेले आहेत, तेव्हा त्याचा परिणाम भारतातही उशिरा का होईना दिसून आला आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, प्लॅटफॉर्मची सेवा सुधारण्यासाठी, प्लॅनचे दर वाढवले जातील जेणेकरून युजर्सना चांगली गुणवत्ता मिळू शकेल. १३ जानेवारीपासून नवीन दर लागू झाल्यानंतर युजर्सना पहिल्या बिल सायकलमध्ये अधिक खर्च करावा लागेल. मात्र, कंपनी विद्यमान प्रमोशनल आणि ट्रायल ऑफर बंद करणार नाही, त्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
भारतात यूट्यूब प्रिमियम प्लॅनसाठी युजर्सला वैयक्तिक दरमहा १४९ रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दरमहा ८९ रुपये खर्च करावे लागतात. फॅमिली प्लॅनसाठी भारतात प्रति महिना २९९ रुपये आकारले जातात. प्रीपेड मासिक योजनेसाठी युजर्सना दरमहा १५९ रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, तिमाही योजनेसाठी ४५९ रुपये आणि वार्षिक योजनेसाठी १४९० रुपये खर्च येतो.