मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्या यू टेलिव्हेंचर कंपनीने यू युनिक २ हा स्मार्टफोन ५,९९९ रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
चिनी कंपन्यांच्या धडाक्यामुळे भारतीय स्मार्टफोन उत्पादक अक्षरश: धास्तावले असल्याची स्थिती सध्या आहे. यामुळे भारतीय ग्राहकांची कधी काळी पसंती मिळालेल्या मायक्रोमॅक्सच्या प्रगतीची गतीदेखील मंदावली आहे. या पार्श्वभूमिवर या कंपनीने आपल्या यू टेलिव्हेंचर या शाखेच्या माध्यमातून यू युनिक २ हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. अर्थात हे मॉडेलही एंट्री लेव्हल या प्रकारातील असल्याचे दिसून येत आहे. हे मॉडेल यू युनिक या स्मार्टफोनची सुधारित आवृत्ती असून यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. २७ जुलैच्या दुपारपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. शँपेन आणि कोल ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.
यू युनिक २ या स्मार्टफोनमध्ये ट्रुकॉलर हे कॉलर आयडी अॅप इनबिल्ट स्थितीत देण्यात आले आहे. यामुळे फोनबुकमध्ये नाव नसणार्या कॉलरचीही ओळख पटून हवा तो कॉल घेणे/नाकारणे सुलभ होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामुळे स्पॅम कॉल्सपासूनही मुक्ती मिळणार आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता, यामध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरणदेखील देण्यात आले आहे. यामध्ये क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.
यू युनिक २ फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीच्या पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो युएसबी आदींचा समावेश आहे. तसेच यात एफएम रेडिओदेखील असेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये अॅक्सलेरोमीटर, अँबियंट लाईट, प्रॉक्झीमिटी सेन्सर प्रदानन करण्यात आले आहेत. हे मॉडेल २,५०० मिलीअँपिअर प्रति-तास क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असून अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे.