झिऑक्स कंपनीन किफायतशीर दरातील फिचरफोन आणि स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ख्यात आहे. या कंपनीने आता ड्युओपिक्स एफ1 हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. याची खासियत म्हणजे यात उत्तम सेल्फीसाठी ड्युअल फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. तर नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या इंटेक्स इएलवायटी ड्युअल या मॉडेलप्रमाणे याचे मूल्यदेखील किफायतशीर आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना 7 हजार 499 रूपयात खरेदी करता येणार आहे. अर्थात इंटेक्सनंतर हा भारतीय बाजारपेठेतील दुसर्या क्रमांकाचा स्वस्त असणारा ड्युअल फ्रंट कॅमेरायुक्त स्मार्टफोन बनला आहे.
झिऑक्स ड्युओपिक्स एफ1 या स्मार्टफोनमध्ये 8 आणि 2 मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यात एलईडी फ्लॅश असून युजर्सला यातून काढलेल्या प्रतिमांना बोके इफेक्ट देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात 2 हजार 400 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार करत, झिऑक्स ड्युओपिक्स एफ1 या मॉडेलमध्ये 5 इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) फुल लॅमिनेटेड 2.5 डी वक्राकार डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम 2 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात काही फ्लॅगशीप स्मार्टफोनमध्ये असणारे फेस अनलॉक हे विशेष फिचरदेखील देण्यात आले आहे हे विशेष. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि स्मार्ट व्हाईट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.