TRP साठी काहीही ! 'देवमाणूस' मालिका सुरू होण्याआधीच रसिकांनी फिरवली पाठ ? प्रोमो पाहून व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:16 PM2020-08-19T16:16:39+5:302020-08-19T16:16:51+5:30
देवमाणूसही मालिकेत 'मर्डर मिस्ट्री' दाखवण्यात आली आहे.
'रात्रीस खेळ चाले' मालिका बंद होणार असून त्याच्या जागी नवी मालिका 'देवमाणूस' सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत. मात्र पहिल्याच प्रोमोने रसिकांची चांगलीच निराशा केली आहे. अशा प्रकारे घातपात आणि नको त्या गोष्टी आता टीव्हीवर दाखवल्या जाणार असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
देवमाणसाच्या चेहऱ्या आड लपलेला राक्षसी चेहरा यात दाखवण्याचा प्रयत्न आहे. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूसही मालिका आहे. मर्डर मिस्ट्री या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात मुख्य भूमिकेत 'लागीर झालं जी' मालिकेमुळे प्रकाझोतात आलेला भैय्यासाहेब म्हणजेच किरण गायकवाड झळकणार आहे.
सोशल मीडियावर 'देवमाणूस' मालिकेविषयी नकारात्मक प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळते. देवमाणूस ही एक थ्रिलर मालिका आहे. सर्वच वयोगटातील रसिक हा मालिका पाहतो. मालिका पाहून आपले मनोरंजन करत असतो. मात्र मनोरंजनाच्या नावाखाली असले घातपात दाखवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मालिकेचा प्रोमोही तसाच थरारक आहे. त्यामुळे ब्रेकमध्ये 'देवमाणूस'चा प्रोमो सुरू होताच चॅनेल बदलले जाते. जेव्हा प्रोमोच चाहते पाहू शकत नाही तेव्हा मालिका कितपत रसिक पाहतील. त्यामुळे मालिकेचे प्रसारण होण्यापूर्वीच या मालिकेकडे रसिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.