जान कुमार सानूच्या मराठी विरोधी वक्तव्यावर गायक कुमार सानू यांनी मागितली माफी, म्हणाले -
By अमित इंगोले | Published: October 30, 2020 10:05 AM2020-10-30T10:05:06+5:302020-10-30T10:11:25+5:30
जान कुमार सानू याने मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावर आधीच माफी मागितली आहे. आता त्याचे वडील गायक कुमार सानू यांनीही मुलासाठी माफी मागितली आहे.
बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा लहान मुलगा जान कुमार सानू टीव्हीवरील सर्वात चर्चीत रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या घरात स्पर्धक म्हणून आहे. जानने एका एपिसोडदरम्यान निक्की तांबोळी आण राहुल वैद्यला मराठी बोलण्यास मनाई केली होती. जान निक्कीला म्हणाला होता की, मराठीत बोलू नको मला चिड येते. ही बाब काही लोकांना आवडली नाही. मनसेने यावर माफीची मागणी केली होती. नंतर जानने माफीही मागितली होती. आता यावर त्याचे वडील गायक कुमार सानू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुमार सानू बॉम्बे टाइम्ससोबत बोलताना म्हणाले की, 'जान कुमार सानू बिग बॉसच्या घरात जाण्यात त्यांचा काहीही हात नव्हता. जानने मला याबाबत सांगितलं तेव्हा मी त्याला मनाई केली होती. कारण मला वाटत होतं की, हा एक वादग्रस्त शो आहे. या शोमधून तुम्हाला प्रसिद्धीही मिळते आणि बदनामीही मिळते. काही लोक तुमच्या सपोर्टमध्ये आहेत तर काही विरोधात आहेत. नंतर जानने मला फोन करून सांगितले की, हा त्याचा अंतिम निर्णय आहे. त्यामुळे मी त्याला बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मदत केली हे चुकीचं विधान आहे'. (Big Boss 14 Video: यापुढे अशी चूक होणार नाही, मराठी माणसांची माफी मागतो; जान कुमार सानूचा माफीनामा)
ते म्हणाले की, 'मी ऐकलं की, माझ्या मुलाने शोमध्ये फार चुकीचं विधान केलं. मी कधीही ४० वर्षात असा विचार केला नाही. महाराष्ट्राबाबत असा विचार करण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी सर्वच भाषांचा आदर करतो आणि प्रत्येक भाषेत गाणी गायली आहेत. मी माझ्या मुलापासून गेल्या २७ वर्षांपासून वेगळा आहे. मला नाही माहीत त्याच्या आईने त्याला काय शिकवलं. एक पिता या नात्याने मी केवळ माझ्या मुलासाठी तुम्हाला सर्वांची माफी मागू शकतो'.
कुमार सानू पुढे म्हणाले की, ते नेहमीच आपल्या परिवाराच्या संपर्कात राहिले आहेत. पण त्यांची एक्स वाइफ आणि मुलगा स्वत:च त्यांचे निर्णय घेतात. ते म्हणाले की, 'हो, मी माझ्या तिन्ही मुलांसोबत डीनर केलं आहे. कधी कधी मी जानला शॉपिंगलाही घेऊन जातो. तो बालपणापासून संगीत शिकतोय. मी संपर्कात आहे पण त्याचे सर्व निर्णय त्याचे आहेत आणि त्याच्या आईचे आहेत'.
जान कुमार सानूच्या नुकत्याच झालेल्या वादाववर कुमार सानू म्हणाले की, 'जानने नकळत मराठी भाषेबाबत जे बोलले ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, बंगाली जर माझी देवकी आई आहे जिने मला जन्म दिला तर मुंबई माझी यशोदा आई आहे. जिने मला काम दिलं, अन्न दिल आणि मान-सन्मान दिला. माझी आई मुंबा देवीवर श्रद्धा आहे. कोणत्याही कलाकाराने मुंबईबाबत वाईट बोलू नये. मुंबईने अनेकांना जीवन दिलं आहे'.
कुमार सानू म्हणाले की, योगायोगाची बाब ही आहे की, माझी मुलगी शेनॉन ही एक मराठी ब्राम्हण परिवारातील आहे. मी तिला अनाथालयातून दत्तक घेतलं होतं. त्यावेळी ती केवळ १ महिन्याची होती. ती अमेरिकेत एक लोकप्रिय गायिका आहे. माझी पत्नी नोकरी करते आणि माझी लहान मुलगी शिकते. ते नेहमी बोलतात की, तुम्ही अमेरिकेत या. पण माझं मुंबईसोबत वेगळं नातं आहे. जेव्हा तब्येत ठीक नसेल तेव्हा तर जावंच लागेल. पण मुंबईला मी खूप मीस करणार'. (शुद्ध मराठीतील माफीनामा; मनसेने जान कुमार सानूवरून उद्धव ठाकरेंना डिवचले)
ते पुढे म्हणाले की, 'सर्वात महत्वाची बाब ही आहे की, जान कुमार सानू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बिग बॉसमध्ये गेला होता आणि त्यावर त्याने लक्ष द्यावं. तो चांगला मुलगा आहे. तो नेहमी मोठयांचा सन्मान करतो. रिताजीने जानला चांगले संस्कार दिले आहेत. पण राहुल त्याला पुन्हा पुन्हा ही आठवण का करून देत आहेत की, त्याचे पालक वेगळे झाले आहेत? भावनांसोबत खेळणं चुकीचं आहे. मला विश्वास आहे की, राहुलचे आई-वडील हे समजू शकतील. राहुल एक चांगला गायक आहे. तोही माझ्या मुलासारखा आहे. पण माहीत नाही तो असं का बोलतोय. कदाचित तो टीआरपीसाठी असं करत असेल. मला नाही माहीत'.