'आईला सोडुन कधी कुनी जातं का?'; साताऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 02:56 PM2023-07-09T14:56:41+5:302023-07-09T14:57:52+5:30

Kiran mane: किरण माने मुळचे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचा सातारीपणा त्यांच्या पोस्टमधून कायम दिसून येतो.

marathi actor kiran mane special post on satara city ajinkyatara news | 'आईला सोडुन कधी कुनी जातं का?'; साताऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

'आईला सोडुन कधी कुनी जातं का?'; साताऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

googlenewsNext

उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर किरण माने उघडपणे भाष्य करत असतात. किरण माने मुळचे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचा सातारीपणा त्यांच्या पोस्टमधून कायम दिसून येतो. यामध्येच त्यांनी साताऱ्याप्रतीचं प्रेम व्यक्त करणारी एक पोस्ट शेअक केली आहे. सातारा आईप्रमाणे असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे किरण माने यांची पोस्ट? 

"...लोकं म्हन्त्यात "सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई.. कशाला यवढी दगदग करत असता? मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन." खरंतर मुंबै लै आवडती. नाटका-सिनेमात रमनारी ! जगातलं हे एकमेव शहर असं आसंल, जिथं रोज, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग अस्तो. कुठं ना कुठं, कस्लं ना कस्लंतरी शुटिंग सुरू आस्तं. कस्लं भारीय हे ! पन सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. गेली दहा वर्ष मी नाटक-सिनेमा सिरीयलनिमित्तानं हळूहळू मुंबैत बिझी होत गेलो. पन शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्‍याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत....माझ्या घराशेजारी भक्कम पाय रोवून माझ्या पाठीशी उभा असलेला अजिंक्यतारा.. म्हैन्यातनं एकदातरी हाक मारून बोलवून घेनारं कास पठार.. आस्तीक असो नायतर नास्तिक, अस्सल सातारकर एकातरी श्रावनी सोमवारी यवतेश्वरला आनि दिवाळीत पयल्या अंघोळीला खिंडीतल्या गनपतीला जातोच.. कधीमधी सज्जनगडावर जाऊन तिथल्या महाप्रसादाची चव चाखतोच ! पावसाळ्यातल्या ठोसेघरपुढं स्कॉटलंड आन युरोप झक मारंल राजेहो !!", असं किरण माने म्हणाले.

पुढे ते लिहितात, "कधी मन उदास झालं तर माहूलीला कृष्ना-वेन्नेच्या संगमावर जाऊन वहात्या पान्याकडं एकटक बघत बसायचं. मूड फ्रेश असला तर कन्हेर डॅमवर चक्कर मारायची... काय-काय सांगू ! कधी वरच्या रोडवरनं राजवाड्यावर जाऊन खालच्या रोडवर्न परत पोवई नाक्यावर आलं तर आख्खं सातारा भेटतं... दोस्तलोकं हाक मारत्यात "ऐ किरन्या भावा...लै मोट्टा ॲक्टर झालास.. आमाला इसारला न्हायस ना? ये की घरी रैवारी मटन खायाला." बास. आजून काय पायजे? मुंबै बापासारखी असली तरी सातारा आईसारखी माया करतं माझ्यावर... आपल्या आईला सोडुन कधी कुनी जातं का? म्हनूनच, मुंबैत काम करायला शंभर हत्तींचं बळ देनारा माझा सातारा आपन कधीच सोडनार नाय गड्या...

दरम्यान, किरण माने यांनी मराठी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. 'ऑन ड्युटी 24 तास', 'कान्हा', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.

Web Title: marathi actor kiran mane special post on satara city ajinkyatara news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.