एका चिमुरडीनं अडवला 'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अमोल कोल्हेंचा रस्ता, या गोष्टीमुळे झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 03:44 PM2020-02-14T15:44:25+5:302020-02-14T15:45:31+5:30
लहान मुलीचे बोलणे ऐकून डॉ. अमोल कोल्हे भावूक झाले होते.
झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता ही मालिका महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. संभाजी राजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हेंवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या प्रेमाचाच अनुभव कोल्हेंनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
डॉ अमोल कोल्हेंनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मतदार संघातील एका चिमुरडीची गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, आज मतदारसंघात एक चिमुरडी भेटली. रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून सांगत होती आज बाहेर जाऊ नका माझ्या घरी चला. नाहीतर ते तुम्हाला पकडतील. मी निशःब्द कृतकृत्य!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या संभाजी राजेंवर शत्रू चालून येतात हा अखेरचा टप्पा दाखवण्यात येत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
काही दिवसांतच स्वराज्य रक्षक संभाजी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.