मुंबई : जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेला टेनिसपटू मारिन सिलिच, यंदाच्या अमेरिकन ओपनचा उपविजेता केविन अँडरसन आगामी महाराष्ट्र ओपन एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाले आहेत. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.पुणे (बालेवाडी) येथे एक ते सहा जानेवारी २०१७ दरम्यान होणा-या या स्पर्धेत सिलिच, अँडरसन यांच्याशिवाय वेगवान सर्व्हिससाठी ओळखला जाणारा इवो कार्लोविच याचाही या स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे गेली २१ वर्षे ही स्पर्धा चेन्नई येथे खेळविण्यात येत होती; परंतु आता ही स्पर्धा पुण्यात हलविण्यात आली आहे.या स्पर्धेचे बोधचिन्ह अनावरण केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, ‘आपल्या देशात टेनिसप्रेमींची कमतरता नाही आणि महाराष्ट्रातील टेनिसप्रेमी ग्रँडस्लॅम आणि डेव्हिस चषक स्पर्धेवर बारीक लक्ष ठेवून असतात. या सर्व स्पर्धा टीव्हीवर पाहिल्या जातात, परंतु प्रत्यक्षात टेनिस सामना पाहणे रोमांचक असते.’याप्रसंगी संयोजन समिती अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी, बनमाळी अग्रवाला, एन. चंद्रशेखर, संयोजन सचिव प्रवीण दराडे, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार व संजय खंदारे आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे (एमएसएलटीए) मानद सचिव सुंदर अय्यर यांचीही उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण ५ लाख ५० हजार अमेरिकी डॉलरच्या बक्षिसांचा वर्षाव होणार असून, विजेत्या खेळाडूला ८० हजार अमेरिकी डॉलर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. १९९६ साली चेन्नई येथे या स्पर्धेचे पहिल्यांदा आयोजन झाले होते. आतापर्यंत या स्पर्धेत राफेल नदाल, स्टॅनिसलास वावरिंका, कार्लोस मोया, पॅट्रिक राफ्टर, मिलोस राओनिच, मरिन सिलिच या आघाडीच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रात होणारी ही स्पर्धा ‘एमएसएलटीए’च्या यजमानपदाखाली पार पडेल.
जगातील टेनिसपटू खेळण्यास सज्ज,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 5:23 AM