विम्बल्डन ही स्पर्धा ग्रास कोर्टवरील प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा मानली जाते. बिम्बल्डन या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित आणि फ्रेन्च ओपन स्पर्धेचा उपविजेता स्टेफानोस त्सित्सिपास याला अमेरिकेच्या फ्रोन्सिस टिआफोकडून पराभवाचा सामना पत्करावा लागला. फ्रान्सिस टिआफोनं त्सित्सिपास याचा ६-४, ६-४, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोनं आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला. त्यानं सरळ सेट्समध्ये स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव केला. स्टेफानोस त्सित्सिपास हा चौथ्यांदा विम्बल्डन या स्पर्धेत खेळत आहे. परंतु चार पैकी तीन वेळा तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका सामन्यात अव्वल नामांकित असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच यानं वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळालेल्या जॅक ड्रॅपरचा पराभव केला. परंतु जोकोव्हिचला त्याच्या कडव्या प्रतिकारचा सामना करावा लागला. पहिला सेट जिंकत जॅक ड्रॅपरनं जोकोव्हिचला आव्हान दिलं. परंतु पहिल्या सेटमधील पराभवानंतर त्यानं ४-६, ६-१, ६-२,६-२ अशा सेट्समध्ये ड्रॅपरचा पराभव केला. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विम्बल्डन स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. परंतु यावर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.