न्यूयॉर्क : मारिया शारापोव्हा हिने अमेरिकेच्या युवा खेळाडू सोफिया केनिन हिच्यावर अमेरिकन ओपन टेनिसमध्ये पुढची फेरीगाठली आहे. अंतिम १६ खेळाडूंमध्ये तिने स्थान पटकावले, तर पुरुषांच्या गटात २०१४ चा विजेता मरिन सिलीच याला अर्जेंटिनाच्या डिएगो श्वेर्टझ्मन याच्याकडून पराभव पत्करावा लागला.भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या स्पर्धेच्या सामन्यात एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या शारापोव्हा हिने १३९ वे रँकिंग असलेल्या सोफिया हिला ७-५, ६-२ असे पराभूत केले, तर चौथ्या फेरीत तिचा सामना लाटवियाच्या १६ व्या मानांकित अनास्तासिया सेवास्तोवाशी होणार आहे. १५ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांत ती १४ व्यांदा चौथ्या फेरीत पोहोचली आहे.पुरुषांच्या गटात क्रोएशियाच्या पाचव्या मानांकित सिलिच याला अजेंर्टिनाच्या २९ व्या मानांकित डिएगो श्वेर्टझ्मन याच्याकडून ४-६, ६-७, ५-७, ७-५, ६-४ असे पराभूत केले.कॅनडाच्या १८ वर्षांच्या डेनिस शापोवालोवने अंतिम १६ मध्ये स्थान पटकावले आहे. गेल्या २८ वर्षांत अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू ब्रिटनच्या काईल एडमंड गले याने सामन्यातून माघार घेतली. डेनिस त्या वेळी आघाडीवर होता.त्याचा पुढचा सामना स्पेनच्या १२ व्या मानांकित पाब्लो कारेनो बस्टासोबत होईल.
अमेरिकन ओपन : मारिया शारापोव्हा अंतिम सोळामध्ये, मरिन सिलीच पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 5:45 AM