वॉशिंग्टन, दि. 7 - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररला गुरुवारी उपांत्यपूर्वफेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. 20 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक्त असलेल्या फेडररला अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोने पराभूत केले. 36 वर्षाच्या फेडररला स्पर्धेत तिसरे सीडींग मिळाले होते. 24 वे सीडींग मिळालेल्या पोट्रोने फेडररचा 7-5, 3-6,7-6(8), 6-4 असा पराभव केला.
लढाऊ बाण्यासाठी ओळखल्या जाणा-या फेडररने सहजासहजी हार मानली नाही. दोन तास 50 मिनिटे हा सामना सुरु होता. उपांत्यफेरीत डेल पोट्रोचा सामना स्पेनच्या राफेल नदालबरोबर होणार आहे. अमेरिकन ओपन वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असून, फेडररला या स्पर्धेत सर्वच सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी टेनिसपटूंनी कडवी टक्कर दिली. पहिल्या सामन्यात फेडररला 19 वर्षीय अमेरिकी टेनिसपटू फ्रांसिस टायफोने लढत दिली. फेडररने हा सामना 4-6, 6-2, 1-6, 6-4 ने जिंकला.
दुस-या सामन्यातही फेडररने संघर्षपूर्ण विजय मिळवला. रशियाच्या मिखाइल योजने विरुद्ध फेडररने 6-1, 6-7(3), 4-6, 6-4,6-2 असा विजय मिळवला. पहिल्या दोन लढतींच्या तुलनेत तिस-या फेरीत फेडररला स्पेनच्या फेलिसिआनो लोपेज विरुद्ध 6-3, 6-3, 7-5 असा सहज विजय मिळवता आला.
नदाल उपांत्य फेरीतस्पेनच्या राफेल नदालने अपेक्षेप्रमाणे रशियाच्या आंद्रे रुबलेववर सहज विजय मिळवत युएस ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. नदालने हा एकतर्फी सामना एक तास 37 मिनिटांत 6-1, 6-2,6-2 असा जिंकला. नदालचा पुढचा सामना आता युआन मार्टिन डेल पोट्रो यांच्याशी होईल.
व्हीनसची क्वितोव्हावर मात, उपांत्य फेरीत स्टीफन्सचे आव्हानसातवेळेची ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिने बुधवारी वयाच्या ३७ व्या वर्षी यूएस ओपन टेनिसच्या उपांत्यपूर्व सामन्यात दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्वितोव्हा हिच्यावर ६-३, ३-६, ७-६ असा विजय नोंदविला. नववी मानांकित यजमान देशाची खेळाडू व्हीनसला उपांत्य फेरीत ८३ वी मानांकित आपलीच सहकारी स्लोएने स्टीफन्स हिचे आव्हान असेल.डाव्या पायाच्या दुखापतीमुळे ११ महिने कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टीफन्सने लाटव्हियाची १६ वी मानांकित अनास्तासिया सेवास्तोव्हाचा ६-३, ३-६, ७-६ ने पराभव केला. या विजयानंतर व्हीनस जानेवारी २०११ नंतर पहिल्यांदा अव्वल पाच खेळाडूंमध्ये दाखल झाली आहे.अमेरिकेच्या खेळाडू मेडिसन की आणि कोको वांडेरवेगे या जिंकल्या तर १९८१ नंतर पहिल्यांदा उपांत्य फेरीत सर्वच अमेरिकन खेळाडू असतील.