मेलबोर्न - वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आॅस्ट्रेलियन ओपनचा पहिला दिवस अमेरिकन टेनिसपटूंसाठी निराशाजनक ठरला. त्यातच त्यांच्या ‘रडीच्या डावाची’ भर पडली. अमेरिकेची दहावी मानांकित कोको वांदेवेघे ही सामन्यादरम्यान केळींसाठी रुसुन बसली, रायन हॅरिसनने इस्त्रायली प्रतिस्पर्धी डुडी सेलावर खोटारडेपणाचा आरोप केला तर विद्यमान यु.एस.ओपन विजेती स्लोन स्टिफन्स हिला आॅस्ट्रेलियन ओपनसाठी वापरल्या जाणा-या चेंडूंच्या दर्जावरच शंका आली. योगायोगाने हॅरिसनचा संघर्षमय विजय वगळता अमेरिकेचे हे नाराज टेनिसपटू पहिल्याच फेरीत पराभूत झाले. त्यामुळे त्यांचा हा रडीचा डावच ठरला.
दहाव्या मानांकित कोको वांदेवेघे हिने टिमिया बाबोसविरुद्धच्या सामन्यात आयोजकांनी ब्रेकदरम्यान केळी उपलब्ध न करून दिल्याची तक्रार केली. या कारणासाठी पहिला सेट गमावल्यानंतरच्या ब्रेकमध्ये तिने पंच फर्ग्युस मर्फी यांच्याशी वाद घालत अधिक वेळ देण्याची मागणी करत वेळेत कोर्टवर उतरण्यास नकार दिला. यासाठी तिला नियमभंगाची ताकिद देण्यात आली.
केळी कोर्टवर का उपलब्ध नाहीत? आणि ती उपलब्ध नाहीत हा काही माझा दोष नाही, असे तिने आपल्या मागणीचे समर्थन केले. माझ्या गरजांनुसार कोर्टवर तयारी नाही ही माझी चूक नाही अशी तिची भूमिका कायम राहिली.
शेवटी कोकोला कोर्टवर केळी उपलब्ध करून देण्यात आली परंतु तोवर बराच वेळ वाया गेला आणि त्यानंतर पंचांनी तिला पुन्हा लवकर खेळ सुरू करण्यास सांगितले तर ‘कोर्टवर योग्य तयारी नसलेल्या सामन्यासाठी तुम्ही मला ताकीद देत आहात हे योग्य नाही. मी शांत असताना तुम्ही एवढे कठोर कसे आहात, आता केळी आली आहेत तर मला तुम्ही ती खाऊ देणार नाही का?’ असे उत्तर तिने पंचांना दिले. यानंतर सामन्याला जाणून बजून उशिर करत असल्याबद्दल तिला ताकीद देण्यात आली आणि दुसºया सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने अपशब्द पुटपुटल्याबद्दल तिला एका गुणाचा दंडसुद्धा करण्यात आला. एवढा ‘तमाशा’ केलेला हा सामना अखेर कोको वांदेवेघेने ७-६, ६-२ असा गमावला.
रायन हॅरिसनचे आरोप
पुरूष एकेरीत अमेरिकेच्या रायस हॅरिसनने पहिल्या फेरीच्या सामन्यात एका गुणावरून वाद झाल्यानंतर इस्त्रायली प्रतिस्पर्धी डुडी सेलावर खोटारडेपणाचा आरोप केला. बेसलाईनबाहेर पडलेल्या चेंडूचा प्रवासादरम्यान आपल्याला स्पर्श झालेला नव्हता हे सेलाचे म्हणणे खोटारडेपणाचे असल्याचा त्याचा दावा होता.
यावर हॅरिसनने घेतलेली हरकत फेटाळून लावत पंचांनी सेलाला गुण बहाल केला. या वादादरम्यान आणि नंतर इस्त्राळली समर्थकांनी सेलाचे जोरदार समर्थन करतानाच हॅरिसनची हुर्ये उडविली. यामुळे संतापातच असलेल्या हॅरिसनचा संयम दुसºया सेटमध्ये सुटला आणि त्याने डुडी सेलासोबत वाद घातला. त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्याचे टीव्ही कॅमेरांनी टिपले.
या वादावादीसह पाच सेटपर्यंत रंगलेला तीन तास ५० मिनिटांचा हा प्रदीर्घ सामना अमेरिकन हॅरिसनने ६-३, ५-७, ६-३, ५-७, ६-२ असा जिंकला खरा, पण त्याच्या वर्तनावर टीकाच झाली.
स्टिफन्सची चेंडूच्या दर्जावर नाराजी
गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये युएस ओपन जिंकल्यानंतर एकही सामना जिंकू न शकलेली अमेरिकेची स्लोन स्टिफन्स पहिल्याच फेरीत बाद झाली मात्र या पराभवादरम्यान तिनेसुद्धा रडीचा डाव खेळला. मार्गारेट कोर्ट स्टेडियमवरच्या सामन्यांसाठी वापरल्या जाणाºया चेंडूंचा दर्जा योग्य नसल्याची तक्रार तिने पंचांकडे केली.विशेषत: ज्या चेंडूंवर हिरवा ठिपका आहे त्यांच्याबद्दल तिचा आक्षेप होता. या चेंडूंचे वर्तन विचित्र जाणवत असल्याची तिची तक्रार होती. तिच्या या तक्रारीनंतर पंच कार्लोस रोमोस यांनी हिरव्या ठिपक्याचे चेंडू न वापरण्याच्या सूचना तेथील बॉल बॉईज व गर्ल्सना दिल्या. हिरव्या ठिपक्याचे हे चेंडू कदाचित इतर स्पर्धाबाह्य सामन्यांसाठी आणि प्रदर्शनी सामन्यांसाठी असावेत असे मत स्टिफन्सने व्यक्त केले.