नवी दिल्ली : अखिल भारतीय टेनिस महासंघाने (एआयटीए) आशियन गेम्समधील पदका विजेता अंकिता रैना व दिविज शरण यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करणार आहे तर माजी डेव्हिस कप कोच नंदन बाळ यांच्या नावाची शिफारस ध्यानचंद पुरस्कारासाठी करणार आहे.अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला रोहन बोपन्ना शेवटचा टेनिसपटू होता. त्याला हा पुरस्कार २०१८ मध्ये मिळाला होता. दरम्यान, नंदन बाळ यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाठवायचे की ध्यानचंद पुरस्कारासाठी पाठवायचे, याचा एआयटीए अद्याप विचार करीत आहे, पण विश्वासनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बाळ यांचे नाव ध्यानचंद पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. बाळ (६० वर्ष) १९८० ते १९८३ या कालावधीत डेव्हिस कप स्पर्धेत खेळले होते आणि ते अनेक वर्ष भारताच्या डेव्हिस कप संघाचे प्रशिक्षक राहिलेले आहेत. अद्याप एकाही टेनिस प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला नाही.अंकिताची कामगिरीअंकिताने (२७ वर्ष) २०१८ च्या आशियन गेम्समध्ये महिला विभागात कांस्यपदक पटकावले होते. तिने फेडकप स्पर्धेतही शानदार कामगिरी केली आणि भारताला प्रथमच विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंकिता २०१८ फेडकप स्पर्धेदरम्यान आपल्या चमकदार कामगिरीमुळे चर्चेत आली होती. त्यात एकेरीत तिने एकही लढत गमावली नाही. त्यानंतर ती डब्ल्यूटीए व आयटीएफ सर्किटमध्ये भारताची एकेरीतील सर्वोत्तम महिला खेळाडू झाली. यंदा मार्च महिन्यात तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम एकेरीतील १६० वे मानांकन मिळवले. यंदा फेडकपमध्ये अंकिताने पाच दिवसांमध्ये आठ सामने खेळले.
शरणची कामगिरीदिल्लीचा खेळाडू शरणने जकार्तामध्ये मायदेशातील सहकारी रोहन बोपन्नासह पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. तो आॅक्टोबर २०१९ मध्ये भारताचा अव्वल दुहेरीतील खेळाडू ठरला, पण त्यानंतर बोपन्नाने पुन्हा एकदा ते स्थान मिळवले. ३४ वर्षीय या खेळाडूने २०१९ मध्ये दोन एटीपी जेतेपद पटकावले.