अँटवर्प (बेल्जियम) - टेनिसपटू दिविज शरणच्या रुपात भारताला आणखी एक विजेता मिळाला आहे. त्याने अमेरिकेच्या स्कॉट लिपिस्कीसोबत युरोपियन ओपन स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अँटवर्प येथील या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी मेक्सिकोचा सँतियागो गोंझालेझ व चिलीचा ज्युलियो पेराल्टा यांच्यावर 6-4, 2-6, 10-5 असा विजय मिळवला.
विशेष म्हणजे शरण-लिपिस्की जोडीने या स्पर्धेतील आपले चारही सामने टाय- ब्रेकमध्ये जिंकले. त्यांना 250 एटीपी गूण व 31910 युरोंच्या एकत्रित बक्षिसाची प्राप्ती झाली. शरणचे हे तिसरे एटीपी विजेतेपद आहे.
दोन आठवड्यांपूर्वी शरण- लिपिस्की यांनी तैवानमधील एटीपी चॕलेंजर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर बेल्जियममध्ये त्यांनी आपल्या खेळाचा दर्जा अधिक उंचावत अंतिम फेरीत धडक मारली आणि विजेतेपदावर कब्जा केला.
इकडे खेळण्याचा हा फारच चांगला अनुभव होता. मी प्रथमच बेल्जियममध्ये खेळलो आणि मजा आली. प्रत्येक सामना रंगतदार ठरला. चारही सामन्यात आम्ही चांगला खेळ केला याचा मनापासून आनंद आहे, असे या विजेतेपदानंतर शरण म्हणाला. याआधी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दिविज शरणने पूरव राजाच्या जोडीने दुसऱ्या एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले होते.