मुंबई - आशियाई स्पर्धेत 1958 ते 2014 या कालावधीत भारताने एकूण 616 पदके जिंकली, परंतु त्यात एकही पदक हे टेबल टेनिसपटूंना पटकावता आलेले नाही. पण, यंदा ही उणीव भरून निघाली. भारतीय खेळाडूंनी दोन कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवेल. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात कधी न जमलेली गोष्ट यंदा भारतीय खेळाडूंनी करून दाखवली. सुवर्ण व रौप्यपदकांसमोर टेबल टेनिसपटूंचे हे यश गौण वाटत असेल, परंतु याचे महत्त्व खेळाडूच जाणतात.
मनिका बात्रा, अचंता शरथ कमल, साथियन ग्यानसेकरन, मौमा दास यांच्याकडून यंदा पदकांच्या अपेक्षा होत्या. या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडून सुवर्ण नाही, निदान कांस्य पदक तरी अपेक्षित होते. 1958 सालापासून आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन स्पर्धा वगळता चीननेच या क्रीडा प्रकारात हुकुमत गाजवली आहे आणि यंदाही त्यांचाच दबदबा राहिला. भारताला केवळ एखादे पदक पटकावून पदकाचा दुष्काळ संपवायचा होता आणि त्यात ते यशस्वी ठरले.
भारतीय खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद होती, परंतु त्याचे रूपांतर आशियाई पदकांमध्ये करणे, थोडेसे अवघडच होते. पण, राष्ट्रकुलमधील पदकांनी भारतीय खेळाडूंचे मनोबल प्रचंड उंचावलेले होते आणि त्याच जोशात त्यांच्याकडून दोन कांस्यपदकांची लॉटरी लागली.
23 वर्षीय मनिका बात्राने तिच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता केली नसली तरी या स्पर्धेतील अनुभव तिला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कामी येणार आहे. गोल्ड कोस्टमध्ये सर्वाधिक चार पदकं जिंकणारी ती एकमेव भारतीय होती. पण तिला आशियाई स्पर्धेत एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही. मिश्र गटात तिने कांस्य जिंकले.
टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शरथ कमल हाही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे 36 वर्षीय कमल शेवटच्या आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याने एक नव्हे तर दोन कांस्यपदक नावावर केली. मिश्र आणि पुरुष सांघिक अशी दोन्ही पदक त्याच्या नावावर जमा झाली. तीन आशियाई स्पर्धांमध्ये त्याला एकही पदकं न जिंकल्याची खंत होती आणि जकार्ता येथे त्याने ती दूर केली.
ही दोन पदक भारतीय टेबल टेनिसपटूंच्या पुढील यशाची पायाभरणी आहे. त्यामुळे खेळाडूंनाही २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्याचे वेध लागले आहेत.