ठाणे : भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते. देशासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. साध्या राहणीतून त्यांनी विरोधकांनाही आपलेसे केले होते. सभागृहात ते बोलायचे, तेव्हा संपूर्ण सभागृहाचे लक्ष केवळ अटलजींच्या भाषणाकडे असायचे, असे सांगून भाजपाचे ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय केळकर यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.कवी असलेल्या अटलजींचे राजकारणात अतुलनीय योगदान आहे. राजकारणात राहूनही रंग माझा वेगळा, असा त्यांचा स्वभाव होता. जनसंघ ते भाजपाच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम करताना अटलजींना भेटण्याचा योग अनेकवेळा आल्याचे केळकर यांनी सांगितले. अटलजी पंतप्रधान असताना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला गेलो असता एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण काय बोलणार, हा प्रश्न मनात होता. परंतु अटलजींनी स्वत:हून विचारपूस करून आमची सर्वांची माहिती घेतली. माझे नाव संजय सांगताच, संजय उवाच असे त्यांच्या मुखातून हसतमुख वाक्य निघाले.इतकी मोठी व्यक्ती पण इतकी साधी की, पहिल्या भेटीतच आपलेसे करणारी. नंतर, पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावात अटलजी यांची सभा होती. त्या सभेची जबाबदारी माझ्याकडे होती. मी जव्हारलाच मुक्काम ठोकून होतो. केवळ तीन दिवसांत सर्व कार्यकर्त्यांनी ३६ तास प्रचंड मेहनत घेऊन सभा यशस्वी केली आणि अटलजींच्या कौतुकाची थाप मिळाली. त्यांच्याकडे बघून कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळायची. अंगात एक बळ यायचे, असे संजय केळकर यांनी यानिमित्ताने सांगितले.शिष्टाचार बाजूलाअटलजी पंतप्रधान असताना दिल्ली येथे आ. केळकर यांना त्यांच्या भेटीची संधी मिळाली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना कॅमेरा सोबत घेण्यास मज्जाव केला होता. अटलजींनी केळकर यांच्या मनातील हेरले. शिष्टाचार बाजुला ठेऊन त्यांनी आ. केळकर यांना त्यांच्यासमवेत फोटो घेऊ दिला होता.
Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:09 AM