- ललित झांबरेअॅलेक्सीसची मम्मी 'सेरेना विल्यम्स'चाऑस्ट्रेलियन ओपनमधील पुनरागमनाचा सामना वैशिष्ट्यपूर्ण ठरला. तिने जर्मनीच्या तात्याना मारिया हिला सरळ सेटमध्ये मात दिली पण सेरेनाने फक्त ४९ मिनिटात अतिशय सहजगत्या हा सामना जिंकला म्हणून हा सामना वैशिष्ट्यपूर्ण नाही तर दोन माता खेळाडूंदरम्यानचा हा सामना होता. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये असे सामने क्वचितच होतात. ग्रँड स्लॅम स्पर्धेत तर सामन्याच्या दोन्ही खेळाडू 'आई' असणे दूर्मिळच! पण सेरेना सप्टेंबर २०१७ मध्ये आई बनली आणि तेंव्हापासून ग्रँड स्लॅम स्पर्धेत दोन वेळा तिचा 'मम्मी' खेळाडूशी सामना झालाय आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही वेळा सामना सेरेनाने जिंकलाय.
यातील ताज्या सामन्यात सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या तात्याना मारिया हिचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडविला. तर गेल्यावर्षीच्या विम्बल्डनमध्ये सेरेनाने आणखी एक 'मम्मी' टेनिसपटू, रशियाची एव्हजेनिया रोडिना हिला ६-२, ६-२ अशी मात देत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
सेरेना ही अॅलेक्सिस ऑलिम्पिया ज्युनियरची आई, तात्याना ही पाच वर्षांच्या शॉलटची आई तर एव्हजेनिया ही सहा वर्षाच्या अॅनाच्या आई. एव्हजेनिया २३ वर्षे वयातच आई बनली होती तर सेरेना ३६ वर्षे वयात आई बनली. टेनिस जगतात सद्यस्थितीत सेरेना विल्यम्स, तात्याना मारिया, एव्हजेनिया रोडिना यांच्याशिवाय व्हिक्टोरिया अझारेंका, कॅटरिना बोंदारेंको, व्हेरा झ्वोनोरेवा या सध्या सक्रिय आहेत.