मेलबर्न- डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वोज्नियाकी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने रुमानियाच्या अग्रमानांकित सिमोना हालेप हिच्यावर 7-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. यासह जागतिक क्रमवारीत हालेप नंबर वन वरुन पायउतार झाली असून वोझ्नियाकी नवी नंबर वन बनली आहे. वोझ्नियाकीचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.नंबर वन आणि दोघींच्याही पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या दृष्टीने नंबर वन आणि नंबर टू दरम्यान ही प्रतिष्ठेची लढत होती.
त्यात तोडीसतोड संघर्ष पहायला मिळाला. तब्बल दोन तास 50 मिनिटे हा सामना रंगला. दोन्ही खेळाडूंना सामन्यादरम्यान उपचाराची गरज भासली. सामन्याच्या तिसऱ्या व निर्णायक सेटआधी हिट ब्रेक नियम लावण्यात आला. त्यानुसार खेळाडूंना 10.मिनिटे विश्रांती घेता आली.
या विजयानंतर "माझा आवाज कांपतोय" असे वोझ्नियाकी म्हणाली तर तिचे अभिनंदन करताना हालेप म्हणाली की, कॅरोलने माझ्यापेक्षा चांगला खेळ केला. वोझ्नियाकी ही यापूर्वी 2010 आणि 2011 मध्ये नंबर वन होती. यापूर्वी 2009 व 2014 मध्ये तिला युएस ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2011 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती मॅचपॉईंटवरून चीनच्या ली ना कडून पराभूत झाली होती मात्र यंदा तिने विजेतेपद पटकावत त्या कटू आठवणींवर पडदा टाकला.
यंदा दुसऱ्या फेरीत जाना फेटविरुध्द तिने पराभवाच्या उंबरठ्यावरुन मुसंडी मारली होती. त्या सामन्याच्या निर्णायक सेटमध्ये तिने दोन मॅच पॉईंट वाचवले होते. सिमोनाविरुध्दच्या सात लढतीतील तिचा हा पाचवा आणि सलग चौथा विजय होता. सिमोनाला फ्रेंच ओपनच्या दोन उपविजेतेपदानंतर आता पुन्हा,एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.