मेलबोर्न : अत्यंत चुरशीच्या आणि थरारक रंगलेल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रुमनियाच्या सिमोना हालेप हिने जर्मनीच्या अँजोलिका कर्बेर हिचे तगडे आव्हान तीन सेटमध्ये परतावून आॅस्ट्रेलिया ओपन महिला गटाची अंतिम फेरी गाठली. त्याच वेळी, पुरुष गटामध्ये क्रोएशियाच्या मरिन चिलिच याने अपेक्षित विजय मिळवताना ब्रिटनच्या कायल एडमंड याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला.रोड लावेर अरेनामध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात हालेप आणि कर्बेर यांच्यातील लढत तीन सेटपर्यंत रंगला. पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर कर्बेरने जबरदस्त पुनरागमन केले. या वेळी, हालेपकडून अनेक चुका झाल्या. तिचे अनेक फटके कोर्टबाहेर गेल्याने त्याचा फायदा घेत कर्बेरने दुसरा सेट जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला. तरी पुन्हा एकदा तिसºया सेटमध्ये आघाडी घेत हालेपने ३-१ असे नियंत्रण मिळवले होते. परंतु, कर्बेरने झुंजार खेळ करत सामना बरोबरीत आणत आघाडीही घेतली. तिसºया सेटमध्ये दोघींचाही खेळ तोडीस तोड झाला. या वेळी दोघींनीही प्रत्येकी २ मॅच पॉइंट वाचवताना उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, मोक्याच्या वेळी दमछाक झाल्यानंतर कर्बेरकडून माफक चुका झाल्या आणि त्या जोरावर हालेपने अखेर ६-३, ४-६, ९-७ असा रोमांचक विजय मिळवला. तब्बल २ तास २० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हालेपला चांगलेच झुंजावे लागले.दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या कॅरोलिना वोज्नियाकी हिने सहज बाजी मारताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. वेगवान खेळ केलेल्या कॅरोलिनाने बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचे आव्हान ६-३, ७-६ असे परतावले. एक तास ३७ मिनिटांमध्ये बाजी मारलेल्या कॅरोलिनाने तिसºयांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
आॅस्ट्रेलियन ओपन :हालेपची अंतिम फेरीत, थरारक सामन्यात कर्बेरला दिला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:43 AM