मेलबोर्न : सेरेना विलियम्सने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सोमवारी एकतर्फी विजय नोंदवला. सेरेनाने एक गेमने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करीत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलग १० गेम जिंकत लॉरा सिजमुंडचा ६-१, ६-१ ने पराभव केला. सेरेना विक्रमी २४ वे महिला एकेरी ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी उत्सुक आहे. सेरेनाने या लढतीत आपल्या सर्व्हिसवर केवळ ९ गुण गमावले आणि १६ विनर लगावले.व्हीनस विलियम्सने २०१९ नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम सामना जिंकला. तिने २१व्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळताना कर्स्टन फिलिपकेन्सचा ७-५, ६-२ ने पराभव केला. ४० वर्षीय व्हीनस यंदाच्या ड्रॉमध्ये सर्वांत जास्त वय असलेली खेळाडू आहे. ४० वर्षांवरील वयाच्या आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झालेल्या सहा खेळाडूंच्या पंक्तीत तिने स्थान मिळवले. तीन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन नाओमी ओसाकाने अनास्तासिया पावल्युचेनकोव्हाला ६-१, ६-२ असे नमवले. कोरोना महामारीमुळे पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आयोजन तीन आठवडे विलंबाने होत आहे. जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावरील खेळाडू व तीन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन एंजेलिक कर्बरला मात्र अमेरिकेच्या बर्नाडा पेराविरुद्ध ६-०, ६-४ ने पराभव स्वीकारावा लागला.पुरुष एकेरीत अमेरिकन ओपन चॅम्पियन डोमिनिक थीमने पिछाडीवर पडल्यानंतर अनुभवी मिखाइल कुकुशकिनचा ७-६, ६-२, ६-३ ने पराभव केला. सहाव्या क्रमांकाच्या अलेक्जेंडर ज्वेरवने पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत मार्कोस गिरोनचा ६-७, ७-६, ६-३, ६-२ ने पराभव केला.मिलोस राओनिकने फेडेरिको कोरियाचा ६-३, ६-३, ६-२ ने पराभव केला. याव्यतिरिक्त माजी चॅम्पियन स्टेन वावरिंका, फ्रांसिस टियाफोई व टेलर फ्रिट्ज यांनीही विजयी सलामी दिली. गेल मोनफिल्सला मॅराथॉन लढतीत एमिल रुसुवोरीविरुद्ध ३-६, ६-४, ७-५, ३-६, ६-३ असा पराभव स्वीकारावा लागला.ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आठ वेळा जेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने जेरेमी चार्डीचा ६-३, ६-१, ६-२ ने पराभव करीत विजयी सुरुवात केली. त्याने सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थितीवर खुशी व्यक्त करताना म्हटले की, ‘स्टेडियममध्ये पुन्हा प्रेक्षकांना बघून आनंद झाला. गेल्या १२ महिन्यांत येथे मी सर्वाधिक प्रेक्षक बघितले. मी तुमच्या समर्थनासाठी आभारी आहे.’
Australian Open: सेरेना विलियम्स, थीम यांची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 5:24 AM