मेलबोर्न : वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनला आजपासून (सोमवार) प्रारंभ होत असून, सेरेना विलयम्स, नोव्हाक जोकाविच आणि राफेल नदालसारखे अव्वल खेळाडूंचे लक्ष्य इतिहास घडविण्याचे राहील. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतपद पटकावत दिग्गज रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील २० ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी साधणारा नदाल आपल्या जेतेपदाची संख्या २१ करीत अव्वलस्थान गाठण्यास प्रयत्नशील असेल. त्याचसोबत प्रत्येक ग्रँडस्लॅम किमान दोनदा जिंकणारा पहिला खेळाडू ठरण्याचीही त्याला संधी राहील. फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून, तो या स्पर्धेत सहभागी होणार नाही. नदालही पाठदुखीने त्रस्त आहे, पण यातून सावरण्याची त्याला आशा आहे.नदाल म्हणाला,‘मााझ्याकडे दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून, मंगळवारी खेळायचे आहे. मी खेळण्यापेक्षा कुठल्या स्थितीत स्पर्धेला सुरुवात करील, याबाबत विचार करीत आहे. दुखापत गंभीर नाही, पण स्नायू जखडले आहेत. अशा स्थितीत नैसर्गिक खेळ करता येत नाही.’नदाल आपल्या मोहिमेची सुरुवात दुसऱ्या दिवशी मंगळवारी करेल तर जोकोविच व सेरेना सोमवारी आपली सलामी लढत खेळतील.२३ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारी सेरेना प्रदीर्घ कालावधीपासून मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक महिला ग्रँडस्लॅम (एकेरीत २४ जेतेपद) विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. सेरेना म्हणाला,‘हे निश्चितच माझ्या मनात आहे. ते वेगळे दडपण असले तरी आता मला त्याचा सराव झाला आहे. माझ्या जीवनात विजेतेपदाला अधिक महत्त्व आहे. माझ्यासाठी काही बाबी चॅम्पियनशिपपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहे. मी आई असून, व्यक्तीही आहे.’जोकोविचची नजर नववे ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदासह विक्रमामध्ये सुधारणा करण्याव्यतिरिक्त एटीपी मानांकनामध्ये सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहण्याचा फेडररचा विक्रम मोडण्यावर केंद्रित झाली आहे. आतापर्यंत त्याने १७ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले असून, यात तो फेडरर व नदाल यांच्यानंतर सर्वाधिक जेतेपद पटकावणारा खेळाडू आहे.कोरोना व्हायरस महामारीच्या सावटाखाली खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत स्टेडियममध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची परवानगी राहील.अंकिता मुख्य फेरीत स्थान मिळविणारी पाचवी भारतीय महिलाअंकिता रैनाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीच्या ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. ती ग्रँडस्लॅमच्या मुख्य फेरीत स्थान मिळविणारी पाचवी भारतीय भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. अंकिताला एकेरीच्या मुख्य फेरीत स्थान मिळविता आले नाहीत, पण तिच्याकडे पहिल्या फेरीच्या लढती संपेपर्यंत ‘लकी लुजर’ म्हणून पात्रता मिळविण्याची संधी राहील. या २८ वर्षीय भारतीय खेळाडूने रोमानियाच्या मिहेला बुजारनेकसोबत जोडी बनविली आणि तिला महिला दुहेरीत थेट प्रवेश मिळाला. निरुपमा मांकड (१९७१), निरुपमा वैद्यनाथन (१९९८), सानिया मिर्झा आणि भारतीय अमेरिकन शिखा ओबरॉय (२००४) या भारतीय महिलांनी यापूर्वी ग्रँडस्लॅमच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले आहे.
Australian Open: नदाल, जोकोविच, सेरेना यांचे इतिहास घडविण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 3:55 AM