मेलबर्न : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनचा पराभव केला. मात्र या विजयासाठी त्याला चांगलीच झुंज द्यावी लागली. राफाची झुंज यशस्वी ठरली. या विजयाबरोबरच त्याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. स्पर्धेनंतर त्याचे आता नंबर एकवरील स्थान कायम राहील, हे निश्चित झाले.चार सेटपर्यंत तसेच ४ तास रंगलेल्या सामन्यात नदालने ६-३, ६-७,६-३, ६-३ ने विजय नोंदवला. त्याने आॅस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतदहाव्यांदा प्रवेश केला. त्याचा पुढील सामना क्रोएशियाचा सहावा मानांकित मरिन सिलीचविरुद्ध होईल. सामन्यानंतर नदाल म्हणाला, की थोडेसे थकल्यासारखे वाटत असले तरी ते चांगले आहे. मी शेवटपर्यंत आव्हान देणार आहे. विजयानंतर आत्मविश्वास अधिक उंचावला आहे.जोकोविच घेतोय ध्यानाचा आधार-स्पर्धेतील पराभवाची भीती आणि तणावापासून दूर राहण्याच्या प्रयत्नात सध्या सर्बियाचा नोवाक जोकोविच आहे. यासाठी त्याने ध्यानाचा आधार घेतला आहे. मेडिटेशनमुळे त्याला बरीच मदत होत असल्याचे तो स्वत: सांगतो. ‘स्पर्धेतील चौथ्या फेरीतील जागा पक्की करण्याचा दबाव आहे. यासाठी मी रोज ध्यान करतो. यातून मला काय मिळते हे मी सांगू इच्छित नाही; परंतु यात मी मग्न होऊन जातो.चिंता आणि तणावापासून मी मुक्त होण्याचा हा उत्तम मार्ग आहे.पेस-राजा पराभूत-भारताची अनुभवी जोडी लिएंडर पेस आणि पूरव राजा यांना पुरुष दुहेरीतील उपउपांत्यपूर्व सामन्यात युआन सेबेस्टियन कबाल आणि रॉबर्ट फराह या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. बिनमानांकित भारतीय जोडीला १ तास ९ मिनिटांच्या सामन्यात ११ व्या मानांकित जोडीने ६-१, ६-२ ने सरळ सेटमध्ये पराभूत केले.अमेरिकन ओपन २०१७मध्ये ही जोडी दुस-या फेरीतून बाहेर पडली होती. गेल्या एक वर्ष आणि अधिक वेळेपासून लिएंडर पेसला स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही.वोज्नियाकी-नवारो सामना रंगणार-महिला गटात कॅरोलिन वोज्नियाकी हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना स्पेनची अनुभवी खेळाडू कार्ला सुआरेज नवारो हिच्याविरुद्ध होईल. ढगाळ वातावरण असतानाही वोज्नियाकीने शानदार प्रदर्शन केले आणि पहिल्या ग्रॅण्डस्लॅम विजयाची दावेदारी अधिक मजबूत केली. तिने मॅगडालेना रिबरिकोव्हाचा ६-३, ६-० ने पराभव केला. दुसरीकडे, स्पेनच्या नवारोने एस्टोनियाविरुद्ध ४-६, ६-४, ८-६ ने विजय नोंदवला. नवारो ही आपल्या विजयाचे श्रेय आक्रमकतेला देते.
आॅस्ट्रेलियन ओपन : राफा झुंजला अन् जिंकला! दिएगो श्वार्ट्झमनला चारली धुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:43 AM