मेलबोर्न : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित खेळ करताना गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, स्पर्धेत प्रदुषित पावसाच्या रुपाने पुन्हा नवे आव्हान निर्माण झाले. कोर्टवर चिखल झाल्यामुळे ते खेळण्यायोग राहिले नाही. स्थानिक स्टार खेळाडू निक किर्गियोसने चुरशीच्या लढतीत विजयासह तिसरी फेरी गाठली. आॅस्ट्रेलियाच्या किर्गियोसने चार सेटमध्ये फ्रान्सच्या जाईल्स सिमोनचा पराभव केला, तर महिला एकेरीत विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेपने ब्रिटेनच्या हॅरियर डार्टचा पराभव केला.जंगाल आगीतील पिडितांना मदतसाठी रक्कम गोळा करण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे लोकप्रिय झालेल्या किर्गियोसने चार सेटमध्ये ६-२, ६-४, ४-६, ७-५ ने विजय मिळवला. या विजयासह किर्गियोसने चौथ्या फेरीत राफेल नदालविरुद्ध संभाव्य लढतीकडे आगेकूच केली. नदालने सहजपणे आगेकूच करताना अर्जेंटिनाच्या फेडरिको डेल्बोनिस याचा ६-३, ७-६(७-४), ६-१ असा पराभव केला.स्पर्धेला जंगलातील आगीमुळे परसलेला धुर, राख, मुसळधार पाऊस व जोरदार वारा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. त्याआधी, धुळ-माती मिश्रित पावसामुळे मेलबोर्न पार्क कोर्टवर चिखलाचा थर साचला. त्याला हटविण्यासाठी अनेक तास लागले व बाहेरच्या कोर्टचा उपयोगही करता आला नाही.खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर जर्मनीच्या अलेक्झँडर झ्वेरेवने सूर गवसल्याचे संकेत देताना इगोर गेरासिमोव्हचा ७-६ (७/५), ६-४, ७-५ असा पराभव केला. पाचव्या मानांकित डोमिनिक थिएमला आॅस्ट्रेलियाच्या १४० व्या क्रमांकाचा खेळाडू अॅलेक्स बोल्टविरुद्ध पाच सेटपर्यंत घाम गाळावा लागला. थिएमने या लढतीत संयम कायम राखत ६-२, ५-७, ६-७(५/७), ६-१, ६-२ असा झुंजार विजय नोंदवला.महिला एकेरीत हालेपने डार्टचा ६-२, ६-४ असा पराभव केला, तर बेलिंडा बेनसिचने माजी फ्रेंच ओपन चॅम्पियन येलेना ओस्टापेंकोचा पराभव केला. दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन गर्बाइन मुगुरुजाने स्थानिक खेळाडू अजला टोमलानोविचचा ६-३, ३-६, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव केला. (वृत्तसंस्था)सानियाची पहिल्याच फेरीत माघारभारताची स्टार सानिया मिर्झाला आॅस्ट्रेलियन ओपनच्या सलामीलाच कोर्टबाहेर पडावे लागले. दुखापतीने सानियाने दुहेरीचा पहिला सामना अर्ध्यावर सोडून दिला. सानिया व युक्रेनची नादिया किचेनोक यांनी मागच्या आठवड्यात होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत जेतेपद पटकवले होते. गुरुवारी सानिया-नादिया चीनच्या शियुआन हान-लिन झूविरुद्ध २-६, ०-१ अशा पिछाडीवर होत्या. सरावादरम्यान सानियाच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. सानिया-किचनोक २-४ असे पिछाडीवर असताना चीनच्या प्रतिस्पर्धी जोडीने त्यांची सर्व्हिस मोडित काढून सेट जिंकला. सानियाने पहिल्या सेटनंतर मेडिकल टाइमआऊट घेतला. दुसºया सेटमध्येही सानिया पिछाडीवर होती.