नवी दिल्ली : भारतीय टेनिस संघाला डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये पाचव्या मानांकित सर्बियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.आज काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार ही लढत १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत पारंपरिक तीन दिवसांच्या पाच सेट प्रारूपामध्ये सर्बियाच्या यजमानपदाखाली खेळली जाईल.भारताने अलीकडेच चीनचा ३-२ ने पराभव करीत विश्व ग्रुप प्लेआॅफ लढतीसाठी पात्रता मिळवली. ही लढत दोन दिवसांच्या तीन सेट प्रारूपामध्ये खेळली गेली.नोव्हाक जोकोव्हीचच्या अनुपस्थितीत सर्बियाला अमेरिका संघाने यंदा फेब्रुवारी महिन्यात ३-१ ने पराभूत केले. यापूर्वी भारत व सर्बिया संघांदरम्यान विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये लढत झाली होती. बंगळुरूमध्ये २०१४ ला खेळल्या गेलेल्या लढतीत सर्बियाने भारताचा ३-२ ने पराभव केला होता.भारतीय डेव्हिस कप संघाचे प्रशिक्षक झीशान अली म्हणाले, ‘सर्बियाविरुद्ध त्यांच्या देशात खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. तसे विश्व गटात कुठल्याही संघाविरुद्धची लढत सोपी नसते.’ भारत सलग पाचव्या वर्षी विश्व गटातील १६ संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला गेल्या चार प्रयत्नांत सर्बिया (२०१४), चेक प्रजासत्ताक (२०१५), स्पेन (२०१६) व कॅनडा (२०१७) यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी, २०११ मध्ये भारताने विश्व गटात स्थान मिळविले होते. त्या वेळी भारताला सर्बियाविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
डेव्हिस कप : भारताची लढत सर्बियासोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:50 AM