लखनौ - मोरक्कोविरुद्ध डेव्हिस चषक स्पर्धेत जागतिक गट दोनमधील सामना भारतासाठी फारसा कठीण असणार नाही. मात्र, भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्नाच्या डेव्हिस चषकातील २१ वर्षांच्या कारकीर्दीला या लढतीनंतर पूर्णविराम लागणार असल्याने हा सामना भारतासाठी विशेष आहे.
गेल्या काही वर्षांपासून एटीपीमध्ये मोठ्या खेळाडूंना आव्हान देणाऱ्या एकेरीतील खेळाडूंचा अभाव आणि जिंकता येतील अशा सामन्यांतील पराभवामुळे डेव्हिस चषकातील भारतीय संघाची कामगिरी प्रभावित झाली होती. फेब्रुवारीत भारतीय संघ जागतिक गट दोनमध्ये घसरला. भारताची अशाप्रकारे घसरण कधीही झाली नव्हती. २०१९ मध्ये आलेल्या नव्या प्रारूपानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाची घसरण झाली आहे.
भारत गतवर्षी मार्चमध्ये डेव्हिस चषक लढतीत डेन्मार्ककडून २-३ असा पराभूत झाला होता. या सत्रात भारतीय टेनिससाठी कोणतीही संस्मरणीय घटना घडली नाही; पण गेल्या आठवड्यात बोपन्ना अमेरिकी ओपनमध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचला. युकी भांबरीने एकेरीत खेळणे सोडून दिले आहे. रामकुमार रामनाथन अव्वल ५५० खेळाडूंमधून बाहेर पडला आहे. या सत्रात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये रामनाथन १७ वेळा पहिल्या फेरीतच पराभूत झाला. त्यामुळेच कर्णधार रोहित राजपालने त्याला संघात स्थान दिले नाही. केवळ सरावात मदतीसाठी तो सध्या संघात आहे.
बोपन्ना ४३ व्या वर्षीही शानदार कामगिरी करत आहे. त्याच्या फटक्यांमध्ये अचूकता आहे. कारकीर्दीतील अखेरचा सामना बंगळुरूमध्ये खेळण्याची त्याची इच्छा होती. लखनौ स्टेडियमची क्षमता १३०० जागांची आहे. बंगळुरूमध्ये चाहत्यांसाठी ६५०० जागा आहेत. २००२ मध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत खेळलेल्या ३२ पैकी २२ सामन्यांमध्ये बोपन्नाने विजय मिळवला आहे. भारतीय टेनिस संघटनेने गुरुवारी रात्री विशेष कार्यक्रमात बोपन्नाचे अभिनंदन केले. बोपन्नाचे अनेक मित्र, कुटुंबीय आणि नातेवाईक हा सामना पाहण्यासाठी पोहोचले आहेत.
भारताचा आघाडीचा खेळाडू सुमित नागर फार्मात आहे. तो ऑस्ट्रियात चॅलेंजर टूर्नामेंट फायनल खेळून आला आहे. या सत्रात हा त्याचा तिसरा अंतिम सामना होता.
डेव्हिस चषकात खेळण्याची उत्सुकता संपली...- बदलत्या काळानुसार डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत खेळण्याची उत्सुकता आता संपली आहे, असे रोहन बोपन्नाने म्हटले आहे. ही स्पर्धा एका मशीनसारखी झाली आहे. या, खेळा आणि जा असे होते. - सध्याच्या स्थितीत खेळाडूंसाठी डेव्हिस चषक स्पर्धा कोणत्याही एका सामान्य स्पर्धेसारखी झाली आहे. संघातील खेळाडूंमध्ये एकता, योजना, समन्वय आणि पर्यायी खेळाडू उपलब्ध असतील तर कोणताही संघ शानदार कामगिरी करू शकतो; पण हे चित्र दुर्मीळ होत चालले आहे, असेही बोपन्ना म्हणाला.