तियानजिन - रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांच्या एकेरीतील अनपेक्षित पराभवानंतर भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत चीनविरुद्ध पराभवाच्या छायेत आला आहे. यासह गेल्या पाच वर्षांत आशिया स्तरावर पहिल्यांदाच भारत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.युकी भांबरीच्या अनुपस्थितीत रामनाथनकडून मोठी अपेक्षा होती. परंतु, जगातील अव्वल ज्यूनिअर खेळाडू असलेल्या चीनच्या यिबिंग वू याने ७(४)-६, ६-४ अशी बाजी मारत धक्कादायक सुरुवात केली. रामनाथनने पहिल्याच गेममध्ये सर्विस गमावल्यानंतर चांगले पुनरागमन केले. मात्र, सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर त्याला लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही.दुसरीकडे नागलवर भारताची मदार होती. मात्र केवळ ६७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात नागलला जे झांगविरुद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत २४७व्या स्थानी असलेल्या झांगने जबरदस्त नियंत्रण राखताना जागतिक क्रमवारीत २१३व्या स्थानी असलेल्या नागलचा ६-४, ६-१ असा सहजपणे धुव्वा उडवला. (वृत्तसंस्था)शनिवारी लिएंडर पेस - रोहन बोपन्ना यांच्यावर भारताची मुख्य मदार असेल. त्यांचा सामना माओ शिन गोंग - डी वू यांच्याविरुद्ध होईल. हा सामना भारतासाठी करा अथवा मरा असाच असेल. हा सामना जिंकल्यास पेस डेव्हिस कप इतिहासात सर्वाधिक दुहेरी सामने जिंकणारा खेळाडू बनेल.
डेव्हिस चषक टेनिस : भारत चीनविरुद्ध पराभवाच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:59 AM