क्रालजिवो(सर्बिया) : अमेरिकन ओपन चॅम्पियन नोवाक जोकोविच आणि जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानी असलेला फिलिप क्राजिनोविच यांनी न खेळण्याचा निर्णय घेताच सर्बियाविरुद्ध आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या डेव्हिस कप विश्व प्ले आॅफ टेनिस लढतीत कमकुवत भारतीय संघाला विजय नोंदविण्याची सुवर्णसंधी असेल. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उभय संघांना विजयाची समान आशा वाटते.युकी भांबरी आणि दिविज शरण यांच्या अनुपस्थितीत विदेशात खेळणे भारतासाठी अवघड आव्हान असेल. भारताला डेव्हिस चषकात ४३ लढती खेळण्याचा अनुभव असून यजमान संघाला केवळ १४ लढती खेळण्याचा अनुभव आहे.युकीच्या अनुपस्थितीत विजयाची जबाबदारी डावखुरा प्रजनेश गुणेश्वरन याच्यावर असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकेरीत त्याने कांस्य जिंकले होते. प्रजनेशने चीनविरुद्ध पाचवा आणि निर्णायक सामना जिंकून भारताला सलग पाचव्यांदा डेव्हिस चषकाच्या विश्व प्ले आॅफमध्ये स्थान मिळवून दिले. प्रजनेश दडपणाचा सामना भक्कमपणे करतो. इन्डोअर क्ले कोर्टवर होणाºया या लढतीबद्दल प्रजनेश उत्सुक आहे. याशिवाय जागतिक क्रमवारीत १३५ व्या स्थानावर असलेला रामकुमार रामनाथन याने वर्षभरात काही चांगले विजय संपादन केले, पण त्याच्या खेळात सातत्याचा अभाव आहे.सर्बियाचे नेतृत्व दुसान लाजोविचकडे असेल. त्याने माद्रिद ओपनमध्ये चौथ्या स्थानावरील ज्युआन मार्टिन डेल पेत्रोचा पराभव केला होता. संघात ८६ व्या क्रमवारीत असलेला लास्लो जेयर दुसरा एकेरीचा खेळाडू असेल. त्याला डेव्हिस चषकात खेळण्याचा अनुभव नाही.भारताला विश्व गटातस्थान मिळविण्याची संधीभारताने १९२७ पासून सर्बियावर कधीही विजय नोंदविलेला नाही. त्यावेळी सर्बियाचे नाव युगोस्लाव्हिया होते. रविवारी लढतीचा निकाल लागेल तेव्हा भारत चमत्कार करेल, असे मानले जात आहे. असे झाल्यास २०११ नंतर पहिल्यांदा विश्व गटात स्थान मिळविणारा देश ठरणार आहे. १६ देशांच्या एलिट गटात पहिल्याच फेरीत त्यावेळी भारताला सर्बियाकडून पराभवाचा धक्का बसला होता.‘‘आमच्या विजयाची प्रबळ शक्यता आहे. रोहन बोपन्ना सर्वांत बलाढ्य असून त्याला २९ सामने खेळण्याचा अनुभव आहे. शनिवारी त्याच्या बळावर दुहेरीचा सामना जिंकू. मागच्यावर्षी बोपन्ना- एन. श्रीराम बालाजी यांनी उझबेकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली.’’- महेश भूपती,बिगर खेळाडू कर्णधार‘‘येथील इन्डोअर सुविधा वेगळ्या आहेत. यामुळे खेळाचा दर्जा उंचावेल. सूर्यप्रकाश आणि हवेचा अडथळा जाणवणार नाही. इन्डोअर क्ले कोर्ट आमच्यासाठी थोडे नवीन आहे. आमचे खेळाडू क्वचितच अशा कोर्टवर स्पर्धा खेळतात.’’- झिशान अली, कोच भारत.
डेव्हिस कप टेनिस : भारताची विश्व ‘प्ले आॅफ’ लढत आजपासून; युकी भांबरी, दिविज शरण यांची अनुपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:45 AM