नूर सुल्तान (कझाखस्तान) : रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी पाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सहज विजयाची नोंद करीत शुक्रवारी सुरू झालेल्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.एकेरीचे दोन्ही सामने पूर्णपणे एकतर्फी ठरले. रामकुमारने पहिल्या सामन्यात १७ वर्षांचा मोहम्मद शोएब याच्यावर केवळ ४२ मिनिटांत ६-०, ६-० असा सरळ सेटमध्ये विजय साजरा केला. शोएबने केवळ दुसऱ्या सेटमधील सहाव्या गेममध्ये थोडाफार प्रतिकार केला. रामकुमारला त्याने दोन ड्यूसपर्यंत खेचले होते.नागलने डेव्हिस चषकात स्वत:चा पहिला विजय नोंदविला. त्याने एकेरीच्या दुसºया सामन्यात हुफैला मोहम्मद रहमान याच्यावर ६४ मिनिटांत ६-०, ६-२ अशी मात केली. ही लढत तटस्थ ठिकाणी खेळविण्यास विरोध दर्शवून माघार घेणाºया आघाडीच्या खेळाडूंची पाक संघाला उणीव जाणवत आहे.सामन्यानंतर रामकुमार म्हणाला, ‘मी प्रत्येक गुण मिळविण्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळ केला. पहिल्या दिवशी २-० अशी आघाडी मिळविल्याचा आनंद आहे. आज, शनिवारी जीवन आणि लियांडर दोघेही आघाडी दुप्पट करतील, अशी आशा आहे.’पहिल्या सामन्यात कुठलीही चुरस जाणवली नाही; मात्र दुसºया सामन्यात पाकच्या युवा खेळाडूने नागलला थोडा घाम गाळायला लावला. नागलच्या विजयाची प्रतीक्षा वाढली, पण त्याने देखील सहज बाजी मारली.नागल म्हणाला, ‘माझी सुरुवात शानदार होती. अखेरही चांगली झाली. आम्ही दोघांनी दमदार खेळ केला. प्रतिस्पर्धी खेळाडूदेखील चांगलेच खेळले.’ अनुभवी लियांडर पेस आणि जीवन नेदूूचेझियन हे आता दुहेरीत हुफैजा- शोएब यांच्याविरुद्ध खेळणार आहेत. भारताने आतापर्यंत सहा सामन्यांत पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभव पत्करलेला नाही. या लढतीत विजयी कूच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. पेसने दुहेरी लढतीत विजय मिळविल्यास डेव्हिस चषकात विश्वविक्रमी ४४ वा विजय ठरणार आहे.भारताचा बिगर खेळाडू कर्णधार रोहित राजपाल म्हणाला, ‘पाकिस्तानचे युवा खेळाडू आमच्या अनुभवी जोडीविरुद्ध कसा खेळ करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.’ या लढतीचा विजेता संघ विश्व पात्रता फेरीत क्रोएशियाविरुद्ध खेळणार आहे.
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : भारताची पाकिस्तानवर २-० ने आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 2:49 AM