न्यूयॉर्क : आघाडीचा टेनिस खेळाडू राफेल नदाल याने दुखापतीमुळे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना अर्धवट सोडला. त्यामुळे अर्जेंटिनाच्या तिसऱ्या मानांकित जुआन मार्टिन डेल पोत्रो हा थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे. तेथे त्याचा सामना नोव्हाक जोकोविचसोबत होईल.नदाल जेव्हा या सामन्यातून बाहेर पडला तेव्हा २००९ चा विजेता डेल पोत्रो ७-६, ६-२ असा पुढे होता. अंतिम फेरीत त्याला २०११ आणि २०१५ चा विजेता जोकोविच याच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जोकोविच याने आठ वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.जोकोविच याने जपानच्या केई निशीकोरी याला ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत करत २३ व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा पक्की केली.दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या लढतीत जोकोविच याचे पारडे जड राहिले आहे. त्याने १४ लढतीत विजय मिळवला, तर डेल पोत्रो याला फक्त चार वेळा विजय नोंदवता आला. जोकोविच याने अमेरिकन ओपनमध्ये डेल पोत्रोला २००७ आणि २०१२ मध्ये दोन वेळा एकही सेट न गमावता पराभूत केले.गेल्या वर्षी दुखापतीमुळे या स्पर्धेपासून दूर राहिलेल्या डेल पोत्रो याने सांगितले, की आम्ही एक दुसºयाविरोधात ग्रॅण्ड स्लॅम फायनलमध्ये कधीही खेळलेलो नाही. मी एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून त्याचा सन्मान करतो. तो महान खेळाडू आहे.’नदाल म्हणाला, ‘मला सामना मध्येच सोडून जाणे पसंत नाही. जेव्हा एक खेळाडू खेळत असतो आणि दुसरा कोर्ट सोडून जातो तेव्हा त्याला टेनिस सामना म्हणता येणार नाही.’नदाल याने बुधवारी जवळपास पाच तास झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डोमेनिक थिएम याला पराभूत केले.विम्बल्डन चॅम्पियन जोकोविचने निशीकोरीविरोधात १७ सामन्यात १५ वा विजय मिळवला. तो या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्यास उत्सुक आहे.
डेल पोत्रो, जोकोविच अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 3:52 AM