मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये उतरेल त्यावेळी त्याची नजर मेलबोर्न पार्कवर नवव्या आणि कारकिर्दीतील १८ व्या ग्रँडस्लॅम विजतेपेदावर असेल तर त्याचा प्रतिस्पर्धी दानिल मेदवेदेव पहिले जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल.जोकोविचपेक्षा अधिक ग्रँडस्लॅम रॉजर फेडरर व राफले नदाल यांनी जिंकले आहेत. त्यांच्या नावावर प्रत्येकी २० जेतेपदे आहेत. मेदवेदेव अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये हरला होता. त्यामुळे यावेळी तो पहिले ग्रँडस्लॅम पटकावण्यासाठी उत्सुक असेल.
जोकोविच मे महिन्यात ३४ वर्षांचा झाला आणि तो १५ वर्षांपासून आपले वर्चस्व कायम राखणाऱ्या फेडरर व नदाल यांच्या दर्जाचा खेळाडू आहे; तर २५ वर्षीय मेदवेदेव विश्व टेनिसच्या भविष्यातील पिढीचा प्रतिनिधी आहे. फेडरर, नदाल व जोकोविच यांनी एकूण गेल्या १५ पैकी १४ ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. डोमिनिक थीमने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन जिंकले होते.
जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपन सेमीफायनल व फायनलची कामगिरी १७-० अशी आहे. नदालला लाल मातीचा बादशाह म्हटले जाते, तर मेलबोर्न पार्कचा दिग्गज जोकोविच आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता मेदवेदेवने गेल्या मोसमात सलग २० सामने जिंकले आहेत आणि १२ वेळा त्याने जोकोविचसह अव्वल १० मध्ये समावेश असलेल्या खेळाडूंचा पराभव केला आहे.
‘मला कल्पना आहे की, जोकोविचला पराभूत करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. कदाचित पाच तासही खेळावे लागेल आणि एक चूकही महागडी ठरू शकते; पण, ग्रँडस्लॅम फायनल खेळायची आहे आणि तेसुद्धा जोकोविचसारख्या खेळाडूविरुद्ध. ही माझ्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे.’-मेदवेदेव
‘मी येथे जेवढ्यांदा जिंकतो, तेवढी पुढच्या वेळी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.’ -जोकोविच