मुंबई : महाराष्ट्राची युवा टेनिसपटू ॠतुजा भोसले हिला चांगली झुंज दिल्यानंतरही मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इस्त्राईलच्या डेनिझ खाझानिउक हिने आक्रमक खेळ करताना एक तास १५ मिनिटांमध्ये ॠतुजाचा पराभव केला.चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंना वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला होता. यापैकी पहिल्याच फेरीत पराभूत होणारी ॠतुजा तिसरी भारतीय ठरली. याआधी सोमवारी करमन कौर थंडी आणि झील देसाई यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला होता.ॠतुजा जागतिक क्रमवारीत ५७७व्या स्थानी आहे. परंतु, तरीही तीने जागतिक क्रमवारीत २७१व्या स्थानी असलेल्या डेनिझला चांगली झुंज दिली. सरळ दोन सेटमध्ये डेनिझ विजयी झाली असली, तरी तिला ऋतुजाविरुद्ध ६-४, ६-३ असे झुंजावे लागले. पहिल्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी साधत ॠतुजाने सामना चुरशीचा केला. मात्र, यानंतर अनुभवी डेनिझने वेगवान खेळ करताना ५-३ अशी आघाडी घेतली. ॠतुजानेही पुढील गेम जिंकत ४-५ अशी पिछाडी कमी करत सामन्यात रंगत भरले. पण दहाव्या गेममध्ये डेनिझने बाजी मारत पहिला सेट जिंकत १-० अशी आघाडी घेतली.दुसºया सेटमध्ये तुफान सुरुवात केलेल्या डेनिझने सलग चार गेम जिंकत ४-० अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. परंतु, अखेरपर्यंत हार न मानणाºया ॠतुजाने पुन्हा एकदा भरारी घेत ३ गेम जिंकले. मोक्याच्यावेळी खेळ उंचावत डेनिझने सामना तिस-या सेटमध्ये जाणार नसल्याची खबरदारी घेत ६-३ अशी बाजी मारत दुस-या फेरीत प्रवेश केला.अन्य लढतीत दुसरे मानांकन लाभलेली रुमानियाची अॅना बोगदान हिने मेक्सिकोच्या व्हिक्टोरिया रॉड्रिग्ज हिचा ६-१, ६-१ असा फडशा पाडत दणदणीत विजयी सलामी दिली. तसेच, चुरशीच्या झालेल्या लढतीत फ्रान्सच्या अमानदीन हेसेने आॅस्टेÑलियाच्या अरेना रोडिओनोवाचे कडवे आव्हान ७-६(२), ६-३ असे परतावले. चीनच्या जिआ जिंग लु हिनेही स्पर्धेत विजयी सलामी देताना हंगेरीच्या दालमा गाल्फीचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला.
महाराष्ट्राच्या ॠतुजाचे आव्हान संपुष्टात, कडवी झुंज दिल्यानंतरही पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 8:51 PM