पुणे - फ्रांसच्या जिल्स सिमॉनने अव्वल मानांकित मरिन सिलिचचा एकेरीत धक्कादायक पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, द्वितीय मानांकीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने अंतिम फेरी गाठली.महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) यजमानपदाखाली म्हाळुंगे-बालेवाडी येथिल श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या पाहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जागतिक ८९व्या स्थानावर असलेल्या फ्रांसच्या जिल्स सिमॉन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाच्या मरिन सिलिचचा १-६, ६-३, ६-२ असा तीन सेटमध्ये पराभव केला. तब्बल १ तास ५१ मिनिटे चाललेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात पहिल्या सेटमध्ये क्रोएशियाच्या मरिन सिलिचने आपले वर्चस्व कायम राखले. या सेटमध्ये चिलीच याने चपळाईने व आक्रमक खेळ केला. दुसºया, चौथ्या गेममध्ये सिलिच याने सिमॉनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वत:ची सर्व्हिस रोखत हा सेट ६-१ असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली. दुसºया सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या सिमॉनने पुनरागमन करत सिलिचची सर्व्हिस भेदून २-० अशी आघाडी घेतली. यानंतर सिमॉन याने चौथ्या गेममध्ये सिलिचची सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये सिमॉनने पहिल्या, सातव्या गेममध्ये सिलिचची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-२ असा जिंकत अंतिम फेरी गाठली.अन्य लढतीत अँडरसनने बेनोइट पियरेचा ६-७(६), ७-६(२), ६-१ असा पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
अग्रमानांकीत मरिन सिलिचचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:51 AM