- रोहित नाईकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘दोन वर्ष मॅथ्यू एबडेनसोबत केलेला खेळ संस्मरणीय ठरला. त्याच्यासोबत यादरम्यान अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. पण, आता त्याला आगामी सत्रात वेगळ्या साथीदारासोबत खेळायचे आहे. त्यामुळे मी निकोलस बरीएंटोससोबत जोडी केली आहे,’ असे भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बोपन्नासाठी २०२४ चे सत्र चांगले ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या एबडेनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. मात्र, आता तो पुढील वर्षी ॲडलेड ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत कोलंबियाच्या बरिएंटोससोबत खेळेल. याआधी, बोपन्ना पुन्हा एकदा आपला जुना सहकारी क्रोएशियाचा इवान डोडिग याच्यासह खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, यामध्ये तथ्य नसल्याचे सांगत बोपन्नाने या चर्चांनाही पूर्णविराम दिला. मुंबई मॅरेथॉनच्या टी-शर्ट व शूजचे अनावरण करताना बोपन्नाने संवाद साधला. यावेळी स्टार स्क्वॉशपटू सौरव घोषाल याचीही उपस्थिती होती.
तो म्हणाला की, ‘मी डिडिगसोबत जोडी बनवणार असल्याचे वृत्त खोटे आहे. एबडेनला नव्या आता नव्या खेळाडूसह खेळायचे असल्याने माझ्याकडे नवा जोडीदार शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. एबडेनसोबतचा प्रवास शानदार ठरला. मी आता निकोलससोबत खेळणार असून आगामी ॲडलेड आणि मेलबर्न येथील स्पर्धेत त्याच्यासोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.’ बोपन्ना मार्च महिन्यात वयाची ४४ वर्ष पूर्ण करेल. ‘खेळावरील असलेल्या प्रेमामुळे मला अजूनही प्रेरणा मिळते,’ असे त्याने म्हटले. बोपन्ना म्हणाला की, ‘मी अजूनही खेळाचा आनंद घेतो. माझ्यामुळे युवा खेळाडू प्रेरित होतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. २०२४ वर्ष माझ्यासाठी सर्वोत्तम ठरले. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी जेतेपद, जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान यामुळे देशाचाही सन्मान झाला. याचा मला अभिमान आहे.’
माझ्यासोबत माझी अप्रतिम टीम आहे. त्याचप्रमाणे कुटुंबियांकडून मिळणारा पाठिंबा मोलाचा आहे. माझी मुलगी मला खेळताना बघेल, याची मी आशा केली नव्हती. पण, आज ती पाच वर्षांची असून टेनिस कोर्टवर ती मला खेळताना पाहते आणि हे माझ्यासाठी संस्मरणीय ठरत आहे. माझे कुटुंब मला ग्रँडस्लॅम खेळताना पाहतेय याहून दुसरी प्रेरणादायी गोष्ट नाही. - रोहन बोपन्ना