नवी दिल्ली : जयपूरचे भाऊ - बहीण फरदीन कमर आणि फरहत अलीन कमर यांनी बंगळुरूमध्ये १८ वर्षाआतील रोलंड गॅरो सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरी स्पर्धेत विजय मिळवला. त्यामुळे त्यांना फ्रेंच ओपन स्पर्धा पाहण्याची आणि क्ले कोर्ट ग्रॅण्ड स्लॅम दरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भेटण्याची संधी मिळेल. फरदीन याने मुलांच्या गटात तर फरहत हिने मुलींच्या गटात ही स्पर्धा जिंकली आहे. फरदीन बारावीचा विद्यार्थी आहे. त्याने दिल्लीच्या आयुष देशवाल यांच्यावर ६-१,६-० असा विजय मिळवला. तर अकरावीची विद्यार्थिनी असलेल्या फरहत हिने माघारीनंतरही शरण्या गवारे हिच्यावर मुलींच्या गटात विजय मिळवत एकेरीचे विजेतेपद पटकावले. दोन्ही खेळाडूंना त्यांचे वडिल कमरुद्दीन खान हे प्रशिक्षण देतात. ते जयपूर मध्ये राजस्थान टेनिस क्लब देखील चालवतात. कमरूद्दीन यांनी सांगितले की,‘ दोन्ही मुले आमच्या अकादमीत मुलांना शिकवत असतानाच आपला सराव करतात. सकाळच्या सत्रात ते प्रशिक्षणात मदत करतात तर संध्याकाळी एकमेकांसोबत सराव करतात.’पहिल्यांदाच रोलंड गॅरोने भारतात एआयटीए राष्ट्रीय सिरीज स्पर्धेचे आयोजन केले होते.