लंडन- स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एटीपी जागतीक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. स्टुटगार्ट ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारुन त्याने हे स्थान पुन्हा काबीज केले आहे.
36 वर्षीय फेडररचे आता 8820 गूण आहेत. फ्रेंच ओपन 11 व्यांदा जिंकणारा राफेल नदाल दुसऱ्या स्थानी घसरला असून त्याचे 8770 गूण आहेत तर जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव 5965 गुणांसह तिसऱ्या स्थानी असेल. या नव्या क्रमवारीची अधिकृत घोषणा सोमवारी होईल.
फेडररने स्टुटगार्ट ओपनच्या उपांत्य फेरीत नीक किर्ग्योसवर 6-7, 6-2,7-6 असा विजय मिळवला. आता विजेतेपदासाठी त्याचा सामना मिलोस राओनीकशी आहे. गेल्या 11 आठवड्यात फेडररची ही पहिलीच स्पर्धा आहे.
फेडरर यावर्षी तिसऱ्यांदा क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचला आहे. 2012 नंतर यंदा प्रथमच फेब्रुवारीत फेडररने सहा आठवड्यांसाठी अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर पुन्हा 14 मेपासून आठवडाभर तो अव्वलस्थानावर होता.