स्टुटगार्ड : दिग्गज टेनिसस्टार रॉजर फेडररने याने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावतानाच स्टुटगार्ड ओपन स्पर्धेच्या जेतेपदालाही गवसणी घातली. यासह फेडररने आपला कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनचा ‘क्ले कोर्टचा बादशाह’ राफेल नदाल याला पिछाडीवर टाकले. विशेष म्हणजे स्टुटगार्ड ओपनची उपांत्य फेरीत विजय मिळवताच फेडररने अव्वल स्थान पटकावले, तर आता स्पर्धा जिंकून त्याने आपले स्थान भक्कम केले आहे. फेडररने स्टुटगार्ड ओपन स्पर्धा जिंकताना आपल्या कारकिर्दीतील एकूण ९८ वे जेतेपद पटकावले. फेडररने गेल्या एक वर्षापासून ग्रास कोर्टवर एकही पराभव पत्करलेला नाही. तसेच, एक वर्षापासून तो क्ले कोर्टवर एकही सामना खेळलेला नाही. गेल्या ११ आठवड्यांमध्ये पहिलीच स्पर्धा खेळलेल्या फेडररने यंदा तिसऱ्यांदा जागतिक अव्वल स्थानी झेप घेतली. २०१२ नंतर त्याने प्रथमच अव्वल स्थान पटकावले होते. सहा आठवडे अव्वल राहिल्यानंतर तो पुन्हा १४ मेपासून आठवडाभर अव्वल स्थानी होता.पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झालेल्या फेडररच्या खात्यात ८,८२० गुणांची नोंद असून द्वितीय स्थानी असलेल्या राफेल नदालच्या खात्यात ८,७७० गुण आहेत. त्याचवेळी ५,९६५ गुणांसह जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव तृतीय स्थानी विराजमान आहे.>स्टुटगार्ड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फेडररने निक किर्गिओस याचे कडवे आव्हान ६-७(२-७), ६-२, ७-६(७-५) असे परतावून अंतिम फेरी गाठली आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही काबिज केले. यानंतर त्याने आपला हाच धडाका अंतिम फेरीतही कायम राखताना कॅनडाच्या मिलोस राओनिक याचा सरळ दोन सेटमध्ये ६-४, ७-६(७-३) असा पराभव करुन जेतेपदाला गवसणी घातली. या शानदार कामगिरीसह आगामी विम्बल्डन स्पर्धेतील जेतेपद कायम राखण्यासाठी आपण सज्ज असल्याचे फेडररने सिद्ध केले आहे.
फेडरर पुन्हा ‘टॉपर’, स्टुटगार्ड ओपन जेतेपदासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:53 AM