मेलबर्न : गतविजेत्या रॉजर फेडररने आपल्या शंभराव्या सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्ज याचा ६-२, ७-५, ६-२ असा पराभव करीत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे, दिग्गज राफेल नदाल यानेही आपली आगेकूच कायम ठेवली. त्याचप्रमाणे, महिला एकेरीत रशियाच्या मारिया शारापोव्हाने गतविजेत्या कॅरोलिना वोज्नियाकीवर सनसनाटी विजयासह चौथ्या फेरीत आपले स्थान पक्के केले.
जागतिक क्रमवारीतील ५० व्या स्थानावर असणाऱ्या फ्रिट्जजवळ २० ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररच्या शानदार खेळाचे कोणतेही उत्तर नव्हते. शुक्रवारी केवळ १ तास २८ मिनिटे रंगलेल्या या लढतीत फेडररने ६३ व्यांदा ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीत पोहोचण्याचा विक्रम रचला. उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के करण्यासाठी त्याला १४ व्या मानांकित स्टेफानोस सिटसिपास याचे आव्हान मोडीत काढावे लागेल.फेडररने पहिला सेट अवघ्या २० मिनिटांत जिंकला. माजी ज्युनिअर नंबर वन फ्रिट्जने दुसºया सेटमध्ये फेडररला कडवी झुंज देत ५-५ अशी बरोबरी साधली; परंतु फेडररने हा सेटही ७-५ असा जिंकला. तिसºया सेटमध्ये फेडररने फ्रिट्जला संधीच न देता ६-२ अशी बाजी मारत सामना जिंकला. फेडरर, नोव्हाक जोकोविच व राय एमरसन यांनी आॅस्ट्रेलियन ओपन प्रत्येकी सहा वेळेस जिंकली आहे.
राफेल नदाल यानेही आपली विजयी घोडदौड कायम राखताना आॅस्टेÑलियाच्या अॅलेक्स डी मिनॉर याचे आव्हान ६-१, ६-२, ६-४ असे परतावले. सहाव्या मानांकीत क्रोएशियाच्या मारिन सिलिच यानेही विजयी कूच करताना स्पेनच्या फर्नांडो वेर्डास्को याला ४-६, ३-६, ६-१, ७-६(१०-८), ६-३ असे नमविले. ४ तास १८ मिनिटे रंगलेल्या या खडतर सामन्यात सिलिचने जबरदस्त संयम दाखवताना बाजी मारली.