बेसेल (स्वित्झर्लंड) - विश्वविख्यात सफल टेनिसपटू रॉजर फेडररने रविवारी स्वित्झर्लंडमधील आपल्या गावी म्हणजे बेसेल येथे टेनिस स्पर्धा जिंकली आणि या विजयाचा आनंद तेथील बॉल बॉईज आणि बॉल गर्ल्ससोबत 'पिझ्झा' पार्टी करुन साजरा केला. फेडररचा हा आनंदोत्सव काही नवा नाही तर त्याची ही प्रथाच आहे. जेव्हा जेव्हा तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचतो त्या प्रत्येक वेळी तो येथील बॉल बॉईज आणि बॉल गर्ल्सना 'पिझ्झा' पार्टी देतो. यंदा फेडररने तेराव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देत आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आणि प्रत्येकवेळी या यशाचा आनंदोत्सव पिझ्झा पार्टीने साजरा केला आहे.
फेडरर असे का करतो, यामागे आहे त्याचा सुरुवातीचा काळ! आपल्या सुरुवातीच्या काळात तोसुद्ध बेसेल टेनिस स्पर्धेत बॉल बॉयचे काम करायचा. वय 11 वर्षे होताना दोन वर्ष त्याने या स्पर्धेत बॉल बॉय म्हणून काम केले होते. 1993च्या मायकेल स्टिच विरुद्ध स्टिफन एडबर्ग दरम्यानच्या अंतिम सामन्यांसाठी तो बॉल बॉय होता. ते दिवस आठवताना फेडरर म्हणतो, " खूप मजा यायची. आघाडीच्या खेळाडूंचा खेळ बघून बघूनच खूप काही शिकायला मिळायचे. तेव्हा मी घरातून सायकलीने स्पर्धास्थळी यायचो. ते दिवस आणि तो आनंद मी अजूनही विसरलेलो नाही म्हणून अजूनही मी बॉल बॉईज व गर्ल्सना 'पिझ्झा पार्टी देत असतो." केवळ पार्टीच नाही तर अंतिम सामन्यात डेल पोट्रोवर तीन सेटमध्ये विजय मिळवल्यावर त्याने तेथील बॉल बॉईज व बॉल गर्ल्सना पदकेसुद्धा प्रदान केली.