शांघाय : जगातील अव्वल क्रमांकाच्या राफेल नदालला ६-४, ६-३ अशी फक्त ७१ मिनिटात सहज मात देत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. फेडररचा नदालविरुद्धचा हा सलग पाचवा विजय होता.टेनिसमधील या आघाडीच्या दोन खेळाडूंदरम्यानचा हा ३८ वा ‘फेडाल’ सामना होता. त्यात फेडररचा हा १५ वा विजय होता. २०१४ च्या आॅस्ट्रेलियन ओपनपासून फेडरर सातत्याने नदालवर विजय मिळवत आला आहे.फेडररने सामन्याची सुरुवातच सर्व्हिस ब्रेकसह दणक्यात केली आणि तोच धडाका कायम ठेवत ६-४,६-३ असा सहज विजय मिळवला.पहिल्या सेटमध्ये फेडररने ८३ टक्के सर्व्हिस पॉर्इंट घेतले. दुसºया सेटमध्ये फेडररने सर्व्हिस ब्रेक घेत ३-२ अशी आघाडी मिळवली आणि दुसºया मॅच पॉर्इंटवर सामना जिंकला. फेडररचा हा राफाविरुद्धचा पाचवा सरळ सेटमधील विजय आहे.फेडररचे हे दुसरे शांघाय विजेतेपद असून कारकिर्दितील ९४ वे विजेतेपद आहे.यासह त्याने इव्हान लेंडलच्या विजेतेपदांची बरोबरी केली असून आता विजेतेपदांच्या बाबतीत केवळ जिमी कॉनर्स त्याच्या पुढे आहे.यंदा विम्बल्डननंतर फेडररने प्रथमच कोणती स्पर्धा जिंकली असली तरी यंदाचे त्याचे हे सहावे अजिंक्यपद आहे.यंदाच फेडररने आॅस्ट्रेलियन ओपन व मियामी ओपनच्या अंतिम फेरीत आणि फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत नदालला मात दिली होती.त्यानंतर आजच्या या विजयासह त्याने नंबर वन नदालच्या सलग १६ विजयांची मालिका खंडित केली आहे. असे असले तरी जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान नदालकडेच कायम राहणार आहे.फेडररने याआधी २०१४ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती, तर २०१० मध्ये तो उपविजेता होता.एटीपी मास्टर्स १००० श्रेणीच्या स्पर्धांतील फेडररचा हा ३५० वा विजय आहे. शांघाय ओपनमध्ये नदालवर त्याने आपले रेकॉर्ड ३-० असे केले आहे.
फेडररचा पॉवर पंच, एक तास ११ मिनिटांत सहज मात : नदालवर सलग पाचवा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:14 AM