मुंबई : सोमवारपासून सुरू होत असलेल्या डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत भारताला चार वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाले असून यामध्ये भारताची आघाडीची खेळाडू अंकिता रैनासह महाराष्ट्राच्या युवा ॠतुजा भोसलेचाही समावेश आहे.मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) यजमानपदाखाली होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मोठी संधी असेल. अंकिता आणि ॠतुजा यांच्यासह करमन कौर थंडी आणि झील देसाई यांनाही वाइल्ड कार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. स्पर्धा मुंबईत होत असल्याने यजमान म्हणून ॠतुजाच्या खेळाकडे सर्वांचे विशेष लक्ष असेल. यंदाच्या वर्षी ॠतुजाने चमकदार कामगिरी करताना आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच तिच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील.यंदा जून आणि सप्टेंबर महिन्यात अनुक्रमे औरंगाबाद व हुआ हीन येथे झालेल्या आयटीएम स्पर्धेचे जेतेपद पटकावत ॠतुजाने स्वत:ची क्षमता सिद्ध केली होती. याच कामगिरीची अपेक्षा तिच्याकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ॠतुजाने सध्याचा फॉर्म कायम राखण्यात यश मिळवले, तर स्पर्धेत तिच्याकडून अनेक धक्कादायक विजय पाहायला मिळू शकतील. २१ वर्षीय ॠतुजा जागतिक क्रमवारीत ६०४ व्या स्थानावर असून पहिल्या फेरीत तिच्यापुढे २३ वर्षांची पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेली इस्त्रायलची डेनिझ खाजानीऊक हिचे आव्हान असेल. दुसरीकडे, भारताचे आशास्थान असलेली अंकिता रैना रशियाच्या बिगरमानांकित वेरॉनिका कुदरमेटोवाविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. १९ वर्षीय करमन कौर थंडी सलामीला स्लोव्हेनियाच्या २४२ व्या स्थानी असलेल्या दलीला जाकूपोविचविरुद्ध खेळेल. तसेच, युवा ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अनुभव असलेली १८ वर्षीय झील देसाईसमोर सलामीला तगडे आव्हान असेल. झीलला पहिल्याच फेरीत १५० व्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या कॅरल झाओविरुद्ध दोन हात करावे लागतील. (वृत्तसंस्था)>मी दुहेरी गटामध्ये वेरॉनिकाविरुद्ध खेळली आहे. पण आता मला माझ्या मनाप्रमाणे खेळण्याची संधी असल्याने मी खुश असून ही लढत नक्कीच चांगली होईल. भारतात इतक्या मोठ्या स्तराची स्पर्धा होत असल्याचा आनंद आहे. एकावेळी एकाच लढतीचा विचार करून आगेकूच करण्याचा प्रयत्न असेल. गेले दोन आठवडे चीन व जपानमध्ये खेळले असल्याने तेथील स्पर्धांचा अनुभव येथे कामी येईल.- अंकिता रैना>यावर्षी दोन आयटीएफ जेतेपद पटकावल्याचा आत्मविश्वास असल्याने मी सकारात्मक आहे. शिवाय मी कोणत्याही दडपणाविना खेळेन. स्पर्धेत अनेक नामांकित आणि अनुभवी खेळाडू असल्याने मला खूप शिकण्याची संधी आहे. त्यामुळे माझ्याहून सरस असलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळल्याचा अनुभव मला पुढील स्पर्धांसाठी फायदेशीर ठरेल.- ॠतुजा भोसले.
भारताच्या चार खेळाडूंना वाइल्ड कार्ड, अंकिता रैनासह महाराष्ट्राच्या ॠतुजा भोसलेला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 3:47 AM